वाल्मिक कराडचे पाय खोलात, तर मुलाला दिलासा; ‘त्या’ प्रकरणातील फिर्याद सोलापूर न्यायालयाने फेटाळली

Walmik Karad | बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खंडणीमध्ये अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी भर पडल्याचे दिसत आहे. ज्या हॉटेलमध्ये वाल्मीक कराडने देशमुख यांच्या हत्येचा प्लॅन आखला त्याठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे.
तर दुसरीकडे वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड दिलासा मिळाला आहे. सुशील कराडवर सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही, असं सांगत बीड न्यायालयात त्याच्या विरोधात दाद मागावी असा आदेश सोलापूर न्यायालयाने दिला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
वाल्मिक कराडच्या मॅनेजरच्या घरात घुसून त्याला मारहाण करून त्याच्या अल्पवयीन मुलीलाही मारहाण केली. तसेच बंदुकीचा धाक दाखवून दोन बल्कर, दोन कार आणि सोने नेल्याचा आरोप सुशील कराड करण्यात आला होता. सुशील वाल्मीक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरुद्ध ही खाजगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी पीडित महिलेने सोलापूर न्यायालयाकडे केली होती.
मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापुरातील सोलापूर पोलीस आयुक्त आणि बीड पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली होती. या दरम्यान, सुशील कराड याच्यातर्फे माजी जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर यांच्यासह ॲड. राहुल रुपनर, ॲड. शैलेश पोटफोडे यांनी बाजू मांडली.
मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार
मात्र पीडित महिलेच्या मागणीनुसार सुशील कराड विरोधात सोलापुरात गुन्हा दाखल करता येणार नाही. संपूर्ण घटनाक्रम ही बीड जिल्ह्यातील असल्याने सोलापूरच्या हद्दीत गुन्हा दाखल करता येणार नाही, असे कोर्टाने आदेश दिले आहेत. दरम्यान, संबंधित गुन्हा न्यायालयीन स्थळ सीमेत नसल्यामुळे परळी येथील कोर्टात न्यायालयात दाद मागण्याच्या दिलेल्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे फिर्यादीचे वकिल ॲड विनोद सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.





