बीड : बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाशी संबंधित खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. वाल्मीक कराडने थेट खंडणी मागितल्याचा आतापर्यंत कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. पण आता त्याने खंडणी मागितल्याचा ठोस पुरावा असणारा सुदर्शन घुलेचा एक महत्त्वाचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यात तो वाल्मीक कराडचे नाव घेत खंडणी मागताना दिसून येत आहे. यामुळे वाल्मीक कराडच्या अडचणींत मोठी भर पडली आहे. संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी नुकतेच केज कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात वाल्मीक कराड हाच देशमुख हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी खंडणी प्रकरणातूनच देशमुखांची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. पण बचाव पक्षाने हा आरोप फेटाळून लावला आहे. विशेषतः वाल्मीक कराडने स्वतः खंडणी मागितल्याचा कोणताही पुरावा नाही असा दावा त्यांनी केला होता. पण आता सुदर्शन घुलेचा वाल्मीक कराडचे नाव घेऊन खंडणी मागितल्याचा एक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याचा उल्लेख आरोपपत्रात आहे. शंभर संभाळण्यापेक्षा एक कराड संभाळा सुदर्शन घुले हा वाल्मीक कराडच्या निर्देशांनुसार आवादा कंपनीत खंडणी मागण्यासाठी गेला होता. या व्हिडिओत सुदर्शन घुले आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना म्हणतो, तुम्ही 100 जण सांभाळण्यापेक्षा एक कराड सांभाळा. तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. वाल्मीक अण्णांनी मागितलेले 2 कोटी रुपये देऊन टाका. तुमचे काम सुरू होईल. मागीलवेळी मी आलो होतो तेव्हा तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली होती. माझ्याविरोधात तुम्ही पोलिसांत तक्रार दाखल केल्याची गोष्ट वाल्मीक अण्णांना कळली आहे. ते तुमच्यावर संतापलेत. त्यामुळे वाल्मीक अण्णांची मागणी पूर्ण करा अन्यथा तुमची सर्वच कामे बंद केली जातील.