‘मराठा, मराठा काय करतो, मीही 96 कुळी मराठा…’, वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना ठणकावलं

Walmik Karad । बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय तापले आहे. या हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. आता त्यापाठोपाठ खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या वाल्मिक कराडवर देखील मकोका लावण्यात आला आहे.
वाल्मिक कराडवर याच्यावर मकोका लावण्यात यावा, यासाठी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून आंदोलन करण्यात आले होते. त्यातच कराडच्या आई आणि पत्नीकडून देखील परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनाला बसल्या आहेत. कराडच्या पत्नी मंजिरी कराड यांनी पतीवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सोबतच, यावेळी बोलताना त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.
मराठा, मराठा काय करतो. मीही 96 कुळी मराठा आहे. आमच्या महाराजांनी असे जातीवाद करण्यास शिकवले नव्हते. जात बघून खून किंवा गुन्हे होत नाहीत, असे म्हणत मंजिरी कराड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.
मंजिरी कराड म्हणाल्या की, मनोज जरांगे समाजकंटक आहे. समाजात जो तेढ निर्माण करतो समाजकंटकच असतो. त्याच्यावर गुन्हा दाखल करा. मराठा, मराठा सांगतोय, मी पण 96 कुळी मराठा आहे. आमच्या महाराजांनी असले प्रकार शिकवले नाहीत. तुम्ही जे काही आरोप असतील ते सिद्ध करा.
काल तिथे त्या माणसांना सांगतो तुझी महाराष्ट्राला गरज आहे, मग आमची नाही का…याला जातीवाद कुणी शिकवला, जात बघून खून झालेत का, जात बघून गुन्हे होतात का?, असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.
आज कराडवर जे राजकीय नेते आरोप करत आहेत. तेच एकेकाळी कराडकडून मदत घेत होते. आज त्यांच्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी माझ्या पतीचा बळी देऊ नये, असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
दरम्यान, परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी, एका समर्थकाने रॉकेल टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी इतर आंदोलकांनी आग विझवली.




