Vallabh nagar ST Depot – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड (वल्लभनगर) आगारात परिवहनमंत्री सरनाईक यांनी अचानक पाहणी केली. या पाहणी दरम्यान शौचालयांची अस्वच्छता, चालक-वाहकांच्या विश्रांतीकक्षाची दुरवस्था, बंद पडलेले ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे आणि पिण्याच्या पाण्याची वानवा अशा गंभीर समस्या आढळून आल्यानंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांची परिवहनमंत्री सरनाईक यांनी कान उघाडणी केली. पाहणीत काय आढळले? मंत्री सरनाईक यांनी आगारात सुमारे अर्धा तास फेरफटका मारला. शौचालयांमध्ये उघड अस्वच्छता, वाहक-चालकांच्या विश्रांतीकक्षात सुविधांचा अभाव, स्नानासाठी गरम पाणी नाही, प्रवाशांसाठी थंड पाण्याची व्यवस्था नाही, भिंती थुंकीने माखलेल्या आणि अनेक ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे नादुरुस्त अवस्थेत लोंबकळत असल्याचे दिसून आले. आगारात उघडपणे मद्यपान होत असल्याचे वृत्तही त्यांच्या कानावर आले. यावरून संतप्त झालेल्या सरनाईक यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. मंत्र्यांच्या सूचना “बारा तास प्रवाशांची सुरक्षितता ज्यांच्या हाती सोपवतो, त्या चालक-वाहकांना दर्जेदार सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे,” असे सरनाईक यांनी ठणकावले. गरम पाणी, स्वच्छ पेयजल, सुस्थितीतील विश्रांतीकक्ष यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. स्वयंसेवी संस्थांच्या ‘सीएसआर’ निधीतून प्राप्त झालेले वातानुकूलक यंत्र (कुलर) तातडीने जोडून कार्यान्वित करण्यास सांगितले. सर्व ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे सुरू करणे, पोलीस चौकीत अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आणि बस रस्त्यावर उभ्या न करणे, या सूचनाही त्यांनी दिल्या. निधीची तरतूद आपण स्वतः करून देऊ, असे आश्वासनही मंत्र्यांनी यावेळी दिले. पाहणीच्या वेळी खासदार श्रीरंग बारणे, नगरसेविका सुलभा उबाळे, भोसरी प्रशिक्षण संस्थेच्या महाव्यवस्थापक यामिनी जोशी, विभाग नियंत्रक अरुण सिया तसेच आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील उपस्थित होते.