पुणे जिल्हा | वैष्णवांची गैरसोय होणार नाही

इंदापूर, (प्रतिनिधी) – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा सर्वात जास्त मुक्काम इंदापूर तालुक्याच्या हद्दीत होत असतो. दोन गोल रिंगणे नीरास्नान असा विधिवत नयनरम्य सोहळा इंदापूर तालुक्यातच होतो याचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो. शासनाच्या प्रशासनाच्या व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत, मुक्कामी व्यवस्था,
आरोग्य सेवा अन्नदानाची व्यवस्था, अतिशय चांगल्या पद्धतीने करण्याचे नियोजन झाले असून एकाही वारकर्याची गैरसोय होणार नाही, अशी माहिती राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांना दिली.
इंदापूर शहरातील पालखी मुक्कामी स्थळावर आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व शासकीय अधिकार्यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण पार पडले. तसेच गोल रिंगण स्थळाची पाहणी भरणे यांनी अधिकार्यांसमवेत केली. त्यावेळी आमदार भरणे पत्रकारांशी बोलत होते.
पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी निघालेल्या वारकर्यांचे स्वागत मनोभावे इंदापूर तालुक्यातील प्रत्येक घराघरांतील नागरिक करत असतो. वारकर्यांची सेवा करण्याचे भाग्य इंदापूरकरांना मिळत असल्याने आजपर्यंत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ही एक तालुक्यासाठी आनंददायी पर्वणी आहे.
त्यामुळे सर्व सुख-सुविधा अधिक शासनाच्या प्रशासनाच्या वतीने देण्यात येतील. बेलवाडी येथील गोल रिंगण व इंदापूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणातील गोल रिंगण याची परिपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती आमदार भरणे यांनी दिली.





