Vaibhav Suryavanshi : हिरोचा झाला झिरो; वैभव सूर्यवंशीच्या नावावर झाला ‘हा’ लाजिरवाणा विक्रम

Vaibhav Suryavanshi : भारताचा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अंडर-19 क्रिकेट मालिकेत आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने सर्वाधिक सिक्स आणि धमाकेदार शतकासह दमदार कामगिरी केली, पण दौऱ्याच्या शेवटी एका चुकीमुळे त्याच्या नावावर क्रिकेट इतिहासातील लाजिरवाणा विश्वविक्रम नोंदला गेला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या यूथ टेस्ट सामन्याच्या चौथ्या डावात वैभव पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होऊन माघारी परतला आणि क्रिकेट इतिहासातील पहिला असा सलामीवीर ठरला, ज्याने यूथ टेस्टच्या चौथ्या डावात दोनदा गोल्डन डकचा नकोसा विक्रम नोंदवला.
वैभवच्या नावावर नकोसा विश्वविक्रम
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या यूथ टेस्ट सामन्याच्या चौथ्या डावात भारताला विजयासाठी 81 धावांचे आव्हान मिळाले होते. भारतीय कर्णधार आयुष म्हात्रे याने आक्रमक सुरुवात केली, पण सलामीवीर वैभव सूर्यवंशी पहिल्याच चेंडूवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज लचमंड याच्या चेंडूवर वैभवने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु मिड-ऑफला कॅच देऊन तो पॅव्हेलियनमध्ये परतला. यामुळे तो यूथ टेस्टच्या चौथ्या डावात दोनदा गोल्डन डकवर बाद होणारा जगातील पहिला सलामीवीर ठरला. यापूर्वी 2025 मध्ये इंग्लंड दौऱ्यातही वैभव यूथ टेस्टच्या चौथ्या डावात पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. याशिवाय, जो रूट (2010), लाहिरु थिरिमाने आणि ओली रॉबिनसन यांनीही एकदा गोल्डन डकचा अनुभव घेतला होता, परंतु वैभवने हा नकोसा विक्रम दोनदा नोंदवला.
वैभवची ऑस्ट्रेलियातील धमाकेदार कामगिरी
वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील यूथ टेस्ट आणि वनडे मालिकेत आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रभाव पाडला. यूथ टेस्ट मालिकेतील 3 सामन्यांमध्ये त्याने 44.33 च्या सरासरीने 133 धावा केल्या, ज्यात एक धडाकेबाज शतक आणि अनेक आकर्षक फटके समाविष्ट होते. यूथ वनडे मालिकेत त्याने 41.33 च्या सरासरीने 124 धावा कुटल्या. विशेष म्हणजे, संपूर्ण दौऱ्यात वैभवने 18 सिक्स ठोकले, ज्यामुळे तो मालिकेतील सर्वाधिक सिक्स मारणारा खेळाडू ठरला. त्याच्या या आक्रमक खेळाने इंग्लंड दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियातही त्याने आपली छाप पाडली.





