Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची कॉपी करू नको; ‘या’ खेळाडूचे वडिलांनी टोचले कान

आयपीएल 2025 स्पर्धेत 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचे नाव गाजताना दिसत आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार पैकी तीन सामन्यात त्याने आपला प्रभाव टाकला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात तर शतकी खेळी करून त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येक चेंडूवर षटकार मारू शकतो अशी त्याची ख्याती आहे. वैभव सूर्यवंशीचा हा नैसर्गिक खेळ आहे. त्यामुळेच त्याने 35 चेंडूत शतक पूर्ण केलं. या सिझनमध्ये वैभव बरोबर आणखी एका खेळाडूचे नाव चर्चेत आहे ते म्हणजे आयुष म्हात्रे.
आयुष म्हात्रेने देखील आपल्या खेळीने सगळ्यांना प्रभावित केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरूद्धच्या सामन्यात त्याने 48 चेंडूत 5 षटकार आणि 9 चौकार मारत 94 धावा केल्या. त्याचं आयपीएलमधील पहिलं अर्धशतक फक्त सहा धावांनी हुकलं. आयुषने आरसीबीचा फिरकीपटू कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर आक्रमक खेळण्याच्या नादात षटकार मारून शतक पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण तिथेच चूक झाली आणि हातात झेल देत बाद झाला. यानंतर आयुषच्या वडिलांनी त्याचे चांगलेच कान टोचले.
काय म्हणाले आयुष म्हात्रेचे वडील?
‘वैभव सूर्यवंशीची कॉपी किंवा त्याच्या शतक ठोकण्याचा प्रयत्न करू नको. तुला तसं काही करण्याची गरज नाही. तुला तग धरून खेळायचं आहे. जर कोणची तुझी तुलना वैभवशी करत असेल तर ते तुझ्या डोक्यात ठेवू नकोस.’ शतकाबाबत बोलताना ‘जर संघाला विजय मिळत नसेल तर शतकाचं आमच्यासाठी काही महत्त्व नाही. ‘, असं योगेश म्हात्रे म्हणाले. तसेच पुढच्या सामन्यात पूर्ण 20 षटकं खेळण्याचा आणि टीमला जिंकवण्याचा प्रयत्न कर असा सल्ला त्यांनी आयुषला दिला.
आयुष आणि वैभवबद्दल बोलायचे झाले तर हे दोघे अंडर 19 क्रिकेटमध्ये एकमेकांचे ओपनिंग पार्टनर आहेत. अंडर 19 आशिया कप स्पर्धेत या दोघांची जोडी चांगलीच गाजली होती. पण आयपीएल स्पर्धेत दोघंही वेगवेगळ्या संघांकडून खेळत असून दोन्ही संघांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्स, तर आयुष म्हात्रे चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहे. संजू सॅमसन दुखापतग्रस्त झाल्याने वैभव सूर्यवंशीला तर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्याने आयुषला खेळण्याची संधी मिळाली.





