वडगाव मावळ – येथील मातोश्री हॉस्पिटल चौकात आज गुरुवार (दि.27 मार्च) सकाळी सव्वा नऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. पीएमपी बस (क्र. एमएच 14 एचयू 6293), डंपर (क्र. एमएच 14 एचजी 6677) आणि स्विप्ट कार (क्र. एमएच 12 एसई 9824) या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून यात डंपर चालक जखमी झाला आहे. तर यात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून घेतलेल्या माहितीनुसार, तिन्ही वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर असताना मातोश्री हॉस्पिटल जवळील चौकात हा अपघात झाला. चौकात नेहमीच्या ठिकाणी थांबलेली पीएमपी बस, पाठीमागून येणारी स्विप्ट कार आणि तिच्या पाठीमागून येणारा ढंपर यांच्यात हा अपघात झाला. अपघातानंतर स्विप्ट कार बस आणि डंपरच्या मध्ये असल्याने तिचे प्रचंड नुकसान झाले. तर, डंपरमध्ये खडी असल्याने अवजड वाहन ब्रेक लावल्यानंर उलटले. यात डंपरमधील खडी रस्त्यावर सांडली व डंपरची ट्रॉली उलटून खाली पडली, यामुळे डंपरचेही मोठे नुकसान झाले. या अपघातात चालक जखमी झाला असून त्याला तातडीने मातोश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.