वडगाव मावळ – वडगाव मावळ नगरपंचायत निवडणुकीत यंदा मोठी चुरस पाहायला मिळत आहे. नगराध्यक्ष पदासह सर्व १७ नगरसेवक जागांसाठी ज्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल झाले, त्यातून संपूर्ण शहरभर काटे की टक्कर रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. वडगाव शहरातील पिढ्यान्पिढ्या प्रभाव असलेल्या ढोरे आणि म्हाळसकर या दोन प्रमुख घराण्यांमध्ये थेट लढत असल्याने या निवडणुका स्थानिक राजकारणात विशेष महत्त्वाच्या ठरणार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पत्नी अबोली ढोरे यांच्यावर विश्वास टाकला आहे. तर भाजपने माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांच्या कन्या अॅड. मृणाल म्हाळसकर यांना उमेदवारी दिली आहे. या दोन्ही उमेदवारांच्या नावांमुळे पारंपरिक प्रतिस्पर्धा पुन्हा एकदा मतदान रांगेत भिडणार असल्याचे चित्र आहे. या लढतीत वंचित बहुजन आघाडीच्या वैशाली उदागे आणि अपक्ष नाजमाबी शेख या उमेदवारांचाही समावेश असल्याने नगराध्यक्ष पदाची लढत बहुरंगी स्वरूपाची झाली आहे. सात प्रभागांत भावकी आमने-सामने नगरसेवक पदांच्या १७ प्रभागांपैकी तब्बल ७ प्रभागांत भावकी-भावकीची सरळ टक्कर पाहायला मिळणार आहे. यात प्रभाग २ मधील प्रवीण ढोरे विरुद्ध दिनेश ढोरे, प्रभाग ४ मधील सुनीता ढोरे विरुद्ध पूजा ढोरे, प्रभाग ९ मधील सुप्रिया चव्हाण विरुद्ध सारिका चव्हाण, आणि प्रभाग १५ मधील राजेंद्र कुडे विरुद्ध अनंता कुडे या लढतींचा विशेष उल्लेख करावा लागेल. घरातील नातेवाईकच निवडणुकीत आमनेसामने येत असल्याने या प्रभागांचे राजकीय तापमान उंचावले आहे. याशिवाय ढोरे विरुद्ध म्हाळसकर या दोन प्रभावी घराण्यांची सरळ लढत आहे. प्रभाग ६ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार मयूर ढोरे व भाजपचे उमेदवार विशाल वहिले, प्रभाग ८ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार माया चव्हाण व भाजपच्या उमेदवार वैशाली म्हाळसकर, प्रभाग १० मध्ये राष्ट्रवादीच्या आकांक्षा वाघोले आणि भाजपच्या सुजाता भेगडे, प्रभाग ११ मध्ये राष्ट्रवादीचे सुनील ढोरे व भाजपचे किरण म्हाळसकर, प्रभाग १३ मध्ये राष्ट्रवादीचे अजय म्हाळसकर व भाजपचे विनायक भेगडे, प्रभाग १५ मध्ये राष्ट्रवादीच्या अर्चना ढोरे व भाजपच्या अर्चना म्हाळसकर अशी दोन मातब्बर भावकीमध्ये सामना रंगणार आहे. प्रभाग ५ मध्ये राष्ट्रवादीच्या वैशाली ढोरे व भाजपच्या अश्विनी म्हाळसकर या दोन भावकीच्या लढतीत रूपाली ढोरे अशी तिरंगी लढत आहे. सोबतच प्रभाग १२ मध्ये राष्ट्रवादीचे गणेश म्हाळसकर व भाजपचे राजेंद्र म्हाळसकर या भावकीच्या लढतीत अपक्ष उमेदवार अतुल वायकर तर प्रभाग १६ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार मीनाक्षी ढोरे व भाजपच्या उमेदवार राणी म्हाळसकर दोन भावकींच्या लढतीत अपक्ष उमेदवार सायली म्हाळसकर या अपक्षांचा समावेश असल्याने या प्रभागांमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे. एकूणच वडगाव मावळ नगरपंचायत निवडणूक ही ढोरे विरुद्ध म्हाळसकर या परंपरागत राजकीय प्रतिस्पर्ध्यांमध्ये होत असली तरी अपक्षांच्या उपस्थितीने निवडणुकीची चुरस वाढविली आहे.