वडगाव मावळ – तालुक्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषद व वडगाव नगरपंचायत या निवडणुकांसाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली. तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी माजी सभापती विठ्ठल शिंदे आणि वडगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी गणेश ढोरे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील २८ जागांसाठी निवडणूक होणार असून, नगराध्यक्षपद सर्वसाधारण जागेसाठी खुले आहे. लोणावळा नगरपरिषदेतील २७ जागांसाठी निवडणूक होत असून, नगराध्यक्षपद अनुसूचित जाती आरक्षित आहे. तर वडगाव नगरपंचायतीत १७ जागांसाठी निवडणूक होणार असून नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे. तब्बल सात वर्षांनंतर या तीनही स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होत असल्याने, या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार पक्षाने केला आहे.