वडगाव मावळ – वडगाव नगरपंचायत तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हीच यादी २०२५च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानासाठी वापरली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नगरपंचायतीच्या अधिकृत सूचनेनुसार, पुरुष मतदार १०,१८४, महिला मतदार ९,६६३ असून एकूण मतदारसंख्या १९,८४७ इतकी आहे. या मतदार यादीची छापील प्रत नगरपंचायत कार्यालयात आजपासून (दि. २) उपलब्ध राहणार आहे. वडगाव शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या नावाची नोंद अंतिम मतदार यादीत आहे की नाही हे तपासावे. आगामी निवडणुकीत हीच यादी वापरली जाणार असल्याने पडताळणी करणे अत्यावश्यक असल्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांनी केले आहे. नागरिकांसाठी मतदार यादी npvadgaon.in आणि mahaulb.in या संकेतस्थळांवर ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुकांना ऑनलाइन माध्यमातून स्वतःचे नाव तपासता येईल तसेच आवश्यक असल्यास मतदार यादी डाउनलोडही करता येईल. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भातील प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून स्थानिक राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शहरात राजकीय उत्सुकता वाढली असून, संभाव्य उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.