Vadgaon Maval: पाचाणे येथे शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप
Vadgaon Maval: शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न

वडगाव मावळ – शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन शेती व्यवसायाला बळकटी मिळावी, तसेच त्यांच्या आर्थिक प्रगतीला हातभार लागावा, या उद्देशाने मावळ पंचायत समिती, कृषी विभाग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने चांदखेड गणातील पाचाणे येथे शेतकऱ्यांना मका बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
मावळ पंचायत समितीच्या सभापती सुनिता मनोज येवले आणि पुणे जिल्हा परिषद सदस्या मनिषा नितीन मुऱ्हे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाण्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन मिळणार असून, शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी चांदखेडच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता आंबेकर, पशुधन पर्यवेक्षक डॉ. सोनाली नाटकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक छबुराव कडू, माजी सरपंच मनोज येवले, अनिल वाजे, सोमनाथ शिंदे, तानाजी टेमगिरे, शंकर येवले, सुभाष येवले आदी उपस्थित होते.
शेतीपूरक उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि शेती व्यवसाय अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांनी सभापती सुनिता येवले, जिल्हा परिषद सदस्या मनिषा मु-हे, डॉ. नम्रता आंबेकर आणि डॉ. सोनाली नाटकर यांचे आभार मानले.
‘शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शेतीसोबतच शेतीपूरक व्यवसायांना चालना मिळाल्यास ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अधिक सक्षम होण्यास मदत होईल.’ – सुनिता येवले, सभापती, मावळ पंचायत समिती.





