Pune District : ज्ञानोबा-माऊलीच्या गजरात दुमदुमले वडगाव आनंद
Pune District : विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने तसेच टाळ पथकाने केलेल्या नेत्रदीपक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. शिस्तबद्ध पद्धतीने सादर झालेल्या या कार्यक्रमाला पालक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त दाद दिली. यानंतर पालखी आणि बालवारकर्यांची दिंडी शाळेपासून मोक्षधाम मंदिर, मुख्य चौक मार्गे गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोहोचली.

आळेफाटा : भगव्या पताका, डोईवर तुळशी वृंदावन, मुखी ‘ज्ञानोबा-माऊली’चा जयघोष आणि टाळ-मृदंगाचा निनाद… अशा भक्तिमय वातावरणात वडगाव आनंद येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेचा परिसर रविवारी वारकरी भक्तिरसात न्हाऊन निघाला.
कामिका एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य बालदिंडी सोहळ्यात विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांसह तब्बल 600 हून अधिक वारकरी सहभागी झाले. त्यामुळे वडगाव आनंदमध्ये जणू छोटेखानी पंढरीच अवतरल्याचे भावचित्र निर्माण झाले होते. शिक्षणतज्ज्ञ डी. बी. नाना वाळुंज यांच्या प्रेरणेतून सन 2010 पासून सुरू असलेली बालदिंडीची संस्कारमय परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. सकाळी नऊ वाजता शाळेच्या प्रांगणात पालखीपूजन करण्यात आले. त्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या भजनाने दिंडीला सुरुवात झाली.गेल्या अनेक वर्षांपासून शाळेचे माजी विद्यार्थी हरी नाना देवकर यांच्यासह गावातील सांप्रदायिक मंडळी या उपक्रमात सहभागी होत आहेत.
बालदिंडीत विद्यार्थ्यांनी संतपरंपरेचा मनोहारी आविष्कार साकारला. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, सोपानदेव, संत तुकाराम तसेच विठ्ठल-रुक्मिणी यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. हातात भगव्या पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेले बालवारकरी उत्साहाने दिंडीत सहभागी झाले होते. त्यांच्या चेहर्यावरील भक्तिभाव आणि उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
बालदिंडीपूर्वी शाळेच्या मैदानावर भव्य रिंगणाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने तसेच टाळ पथकाने केलेल्या नेत्रदीपक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. शिस्तबद्ध पद्धतीने सादर झालेल्या या कार्यक्रमाला पालक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त दाद दिली. यानंतर पालखी आणि बालवारकर्यांची दिंडी शाळेपासून मोक्षधाम मंदिर, मुख्य चौक मार्गे गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोहोचली.
मंदिरात पूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर गावच्या मुख्य चौकात महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी फुगडी, बस फुगडी, काठवटी-काना आदी पारंपरिक खेळ सादर करून जुन्या संस्कृतीच्या आठवणींना उजाळा दिला. सोहळ्याच्या सांगतेनंतर शाळेत विद्यार्थी, पालक आणि भाविकांना खिचडी, केळी व राजगिरा लाडूचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. पालकांनी खिचडीची व्यवस्था केली. उपसरपंच संतोष पादिर यांनी केळी, तर संदीप गडगे यांनी राजगिरा लाडूचे वाटप केले. देवस्थानचे अध्यक्ष कैलास वाळुंज व सदस्यांनी बालवारकर्यांना केळीचा प्रसाद दिला. योगेश देवकर यांनी ध्वनिव्यवस्थेची सुविधा उपलब्ध करून दिली.
बालदिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय चौगुले पाटील, मुख्याध्यापक सुनील ठिकेकर, शिक्षक छाया डुंबरे, सुनंदा तांबे, गीतांजली वाळुंज आणि सविता खेत्री यांनी विशेष परिश्रम घेतले.





