बेल्हे -राजुरी (ता.जुन्नर) येथे रविवारी पल्स पोलिओ मोहिमेचा माजी सभापती दिपक औटी व सरपंच एम. डी. घंगाळे यांच्या हस्ते करण्यात आला. तालुक्यातील एकूण 34504 लाभार्थींना डोस देण्यात आला.353 बूथ व 22 मोबाईल टीम तर 15 बस स्थानक व टोल नाका या ठिकाणी व्यवस्था केली होती.
तालुक्यात 96 टक्के लस दिली असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.उमेश गोडे यांनी दिली. यावेळी राजुरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उदघाटन करताना माऊली शेळके, एकनाथ शिंदे, उपसरपंच वंदना डुंबरे, अविनाश औटी, जी. के.औटी, डॉ. परीक्षित टाके, ग्रामविकास अधिकारी शरद बाळसराफ उपस्थित होते.
जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहीमेस प्रतिसाद
पुणे जिल्ह्यात पोलिओच्या आजाराचे उच्चाटन करण्याच्या हेतूने केंद्र सरकारच्या आदेशानुसार रविवारी (दि. 19) जिल्ह्यातील गावा गावात, वाड्या वस्त्या व उसतोड मजुरांच्या पालावर जाऊन बालकांना पोलिओचे डोस देण्यात आले आहेत. या राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमुळे बालकांना आजारापासून मुक्ती मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात 21 जानेवारीपर्यंत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम सुरु राहणार आहे. पाच वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना पोलिओ लसीकरण करणे गरजेचे आहे.