पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात करण्यात आली. विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय केंद्र, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व “वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट अँड युथ’ यांच्या सहकार्याने हा लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात ऑनलाइन नोंदणी केलेल्या 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे लसीकरण आजपासून सुरू करण्यात आले. या लसीकरण कार्यक्रमाला महापौर मुरलीधर मोहोळ, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसन्नजीत फडणवीस, अधिसभा सदस्य भाग्यश्री मंठाळकर, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या विभागीय संचालक अनुजा चक्रवर्ती आदी उपस्थित होते. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी विद्यापीठाच्या मदतीने येत्या काळात सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. डॉ. विजय खरे यांनी लसीकरण कार्यक्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सांस्कृतिक संबंध प्रस्थापित होत असून हे विद्यार्थी भारताचे राजदूत म्हणून प्रतिनिधित्व करणार असल्याचे म्हटले.