2024 च्या अखेर जगातील प्रत्येकाला लस

नवी दिल्ली/ पुणे – या वर्षाअखेर जरी करोना प्रतिबंधक लसीचा शोध लागण्याची आशा असली तरी जगातील सर्वांत मोठ्या लस उत्पादन कंपनी सीरमने जगातील प्रत्येकाला करोनाची लस मिळण्यासाठी 2024 ची अखेर होईल, असे म्हटले आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे.

कोणतीही लस उत्पादक कंपनी संपूर्ण जगाला एका वेळी देता येईल इतकी आपली उत्पादन निर्मिती वाढवू शकत नाही. या जगातील प्रत्येकाला ही लस मिळायला आणखी चार ते पाच वर्षांचा कालावधी लागेल. जर या लसीचे दोन डोस प्रत्येकाला द्यायचे असतील तर संपूर्ण जगात 15 अब्ज डोसची गरज भासेल, असे ते म्हणाले.

पुण्यात मुख्यालय असणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे ऍस्ट्राझेन्का आणि नोव्हाव्हॅक्‍ससह जगभरातील पाच नामवंत औषध उत्पादक कंपन्यांशी करोना लस उत्पादनाबाबत करार केले आहेत. एक अब्ज डोस उत्पादनाचे अधिकार सीरमकडे असून त्यातील निम्मे भारतात वापरण्याची परवानगी आहे. रशियाच्या गामालेया रिसर्च इन्स्टिट्यूटशीही त्यांच्या स्पुटनिक लसीच्या उत्पादनासंदर्भात करार करण्याची शक्‍यता आहे.

विकसनशील जगात लागणाऱ्या लसीचा मोठा वाटा पूनावाला यांच्या सीरमकडून उत्पादित केला जाणार असल्याने त्यांच्या वक्‍तव्याला महत्त्व आले आहे. पुनावाला म्हणाले, मला माहीत आहे की, जगाच्या आशा त्यावर लागलेल्या आहेत. मात्र उत्पादन पातळीवर कोणी असल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.