पहिल्या दिवशी तांत्रिक अडचणीत 60 मुलांना लस

पिंपरी – शहरातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना आजपासून कोविड प्रतिबंधक कॉर्बेव्हॅक्स लस देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी तांत्रिक अडचणीमुळे ऍपमध्ये मुलांची नोंदणी होती नव्हती. दुपारी बारा वाजल्यानंतर नोंदणी सुरळीत सुरू झाली. दिवसभरात शहरातील 60 मुलांना लस देण्यात आली आहे.
12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी आकुर्डी, थेरगाव व भोसरी रुग्णालयामध्ये सोय केली होती. प्रत्येक केंद्रावर 200 च्या क्षमतेने लस देण्यात येणार होती. कॉर्बेव्हॅक्स लस घेण्यासाठी कोविन ऍपद्वारे ऑनलाइन स्लॉट बुकींग पद्धतीने 50 टक्के तर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप पद्धतीने 50 टक्के मुलांना लस देण्यात येत आहे.
आज सकाळी लसीकरणाला सुरुवात झाली असता, नोंदणी होत नसल्याने अनेक मुले माघारी फिरून गेली. तर दुपारी 12 वाजल्यानंतर ऍपमध्ये नोंदणी होण्यास सुरूवात झाली. त्यानंतर तीनही रुग्णालयामध्ये एकूण 60 मुलांना लस देण्यात आली आहे.
ऍपमध्ये तांत्रिक गोंधळ झाल्याने नोंदणी होत नव्हती. मात्र दुपारी बारा वाजल्यानंतर लसीकरण सुरळीत सुरू झाले. पहिला दिवस असल्याने हे अडथळे आले. उद्यापासून लसीकरण सुरळीत सुरू होईल.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी





