V. D. Satheesan : केरळचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री व्ही. डी. सतीशन (V. D. Satheesan) यांचे पूर्ण नाव वडासेरी दामोदर सतीशन आहे. त्यांचा जन्म ३१ मे १९६४ रोजी केरळमधील कोची येथील नेटूर येथे एका नायर कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव के. दामोदर मेनन आणि आईचे नाव व्ही. विलासिनी अम्मा आहे. सतीशन (V. D. Satheesan) यांनी केरळ स्टुडंट्स युनियनच्या माध्यमातून तळागाळातील राजकारणात प्रवेश केला. विद्यार्थीदशेत ते एक प्रभावी नेते बनले आणि १९८६-१९८७ दरम्यान महात्मा गांधी युनिव्हर्सिटी युनियनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी काँग्रेसची विद्यार्थी शाखा असलेल्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव म्हणूनही काम केले. ते एक प्रशिक्षित वकील आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून सक्रिय राहिले. त्यांनी जवळपास १० वर्षे केरळ उच्च न्यायालयात वकिली केली. वकिली करत असताना त्यांनी (V. D. Satheesan) राजकारणात प्रवेश केला. V.D. Satheesan १९९६ मध्ये परवूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. हा मतदारसंघ तेव्हा कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला होता आणि त्यात त्यांचा सीपीआयचे उमेदवार पी. राजू यांच्याकडून पराभव झाला. या पराभवानंतरही सतीशन मतदारसंघात सक्रिय राहिले. २००१ मध्ये, परवूर मतदारसंघातून पहिल्यांदा केरळ विधानसभेवर निवडून आल्यावर त्यांना पहिले मोठे राजकीय यश मिळाले. पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर व्ही. डी. सतीशन यांनी मागे वळून पाहिले नाही हा मतदारसंघ त्यांची राजकीय प्रयोगशाळा आणि लाँचपॅड बनला. २००१ पासून ते येथे एकही निवडणूक हरले नाहीत आणि सलग सहा वेळा (२००१, २००६, २०११, २०१६, २०२१ आणि २०२६) आमदार म्हणून निवडून आले आहेत. २००६ मध्ये त्यांनी के. एम. दिनकरन यांचा पराभव केला, तर २०११ मध्ये सीपीआय(एम)चे पन्नियन रवींद्रन आणि २०१६ मध्ये शारदा मोहन यांसारख्या प्रमुख डाव्या नेत्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. त्यांनी आपल्या मतदारसंघात तळागाळातील उपक्रम सुरू केले, जसे की लाखो रहिवाशांसाठी एक मोठा पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प, ज्यामुळे राजकारणापलीकडेही त्यांची विश्वासार्हता वाढली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठे वळण २०२१ मध्ये आले. केरळचे राजकारण असे आहे की दर पाच वर्षांनी सत्तांतर होणे ही एक प्रथाच बनली आहे. तथापि, २०२१ च्या निवडणुकीत डाव्या आघाडीने युडीएफचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला. या पराभवानंतर, काँग्रेस हायकमांडने ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांच्या जागी सतीशन यांची १५ व्या विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली.