Ganpati Visarjan 2025 | ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘पुढच्या वर्षी लवकर या’ ह्या जयघोषात आज लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाची दहा दिवस भक्तीभावाने पूजा करण्यात आली. यानंतर आज विसर्जन सोहळा पार पडणार आहे. मुंबईतील गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटींसह इतर विसर्जन स्थळं ही विसर्जनासाठी सज्ज झाली आहेत. सध्या लालबागचा राजाची विसर्जनापूर्वीची उत्तरपूजा सुरु झाली आहे. थोड्याच वेळात लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होणार आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर दरम्यान, यंदा 6500 सार्वजनिक गणेश मंडळे आणि दीड लाख घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी 25 हजार पोलीस कर्मचारी आणि 10 हजार महानगरपालिकेचे कर्मचारी तैनात असणार आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी 10 हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलिसांकडून प्रथमच एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. याशिवाय वाहतूक आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.