धक्कादायक ! उत्तरप्रदेशमध्ये सत्संग सोहळ्यात चेंगराचेंगरी, 27 जणांचा मृत्यू.

हाथरस : उत्तर प्रदेशमधील हाथरसमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका सत्संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 27 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 25 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. हाथरसमधल्या रतीभानपूरमध्ये या सत्संगचे आयोजन करण्यात आले होते. अचानक या कार्यक्रमामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि ही दुर्दैवी घटना घडली.
काय घडले नेमके?
रतीभानपूरमध्ये भोले बाबांच्या सत्संग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शेकडोच्या संख्येने भक्त सहभागी झाले होते. गर्दी आणि प्रचंड उष्णतेने अनेक भक्त बेशुद्ध पडले. त्यामुळे घटनास्थळी अफरातफरी माजली. यावेळी भक्तांमध्ये धक्काबुक्कीदेखील झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले.
चेंगराचेंगरी का झाली?
सत्संग संपला. लोक एकत्र निघून जात होते. हॉल छोटा होता. गेटही पातळ होते. आधी बाहेर पडण्यासाठी चेंगराचेंगरी झाली. लोक एकमेकांवर तुटून पडले. बहुतेक महिला आणि मुले होती. त्यामुळे दीडशेहून अधिक जण जखमी झाले आहेत.
27 जणांनी गमावला जीव
एटाचे सीएमओ डॉ. उमेश त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार सत्संग कार्यक्रमादरम्यान ही दुर्घटना घडली. डॉ. उमेश त्रिपाठी यांनी 27 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मृतांमध्ये 25 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिस आणि प्रशासनातर्फे बचावकार्य सुरु असून 27 मृतदेहांचं पोस्टमॉर्टम केलं जाणार असल्यांचही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले दुःख
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचं म्हटलं आहे. तसंच अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश देण्यात आले असून वेगाने मदतकार्य करण्याचे निर्देष देण्यात आले आहेत. जखमींना योग्य उपचार देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ही घटना नेमकी कशी घडली? दुर्घटनेत कोण दोषी आहे यासाठी समिती स्थापन करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितले.





