भोर : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) यांच्या माध्यमातून उत्तर प्रदेश राज्यातील वरिष्ठ अधिकारी, सरपंच आणि ग्रामविकास कर्मचाऱ्यांनी भोर तालुक्यातील रांजे गावाला भेट देऊन ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा आणि विविध विकास योजनांचा आढावा घेतला. या भेटीत गावातील ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजासह केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती, कर आकारणी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती घेण्यात आली. रांजे गावाचे सरपंच शिवाजी तावरे यांनी उत्तर प्रदेशातील शिष्टमंडळाचे स्वागत केले. या शिष्टमंडळात उपसंचालक संजय कुमार सिंह, जिल्हा जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार, सहाय्यक विकास अधिकारी राजवीर सिंह आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विजय बहादूर मोर्या यांचा समावेश होता. ग्रामपंचायत अधिकारी नवनाथ झोळ यांनी पुणे जिल्हा परिषदेने राबविलेल्या विविध योजनांची माहिती देताना ग्रामपंचायतीच्या डिजिटल क्यू आर कोड उपक्रमाचीही माहिती दिली. या भेटीवेळी यशदाचे सत्रसंचालक वसंत राजूरकर, विस्तार अधिकारी खंडागळे, ग्रामपंचायत अधिकारी भूषण पुरोहित, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया जायकर, शुभांगी जायकर, महेंद्र रांजेकर, अभिजीत कोंडे, राजेंद्र तावरे, पद्माकर डोंबाळे यांच्यासह गावातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्तर प्रदेशच्या शिष्टमंडळाने गावातील विकासकामे पाहून समाधान व्यक्त केले आणि रांजे गावाच्या प्रगतीचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या समारोपात ग्रामपंचायत अधिकारी भूषण पुरोहित यांनी सर्वांचे आभार मानले. या भेटीमुळे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील ग्रामविकासाच्या उपक्रमांमधील अनुभवांची देवाणघेवाण होऊन परस्पर सहकार्याला चालना मिळाली.