लखनौ – उत्तरप्रदेशातील हाथरस येथे राहुल गांधी आज पुन्हा भेट देण्यासाठी येणार असल्याचे घोषित झाल्यानंतर उत्तरप्रदेश पोलिसांनी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अजयकुमार लल्लू यांना त्यांच्या निवासस्थानीच स्थानबद्ध केले आहे. त्यांनी राहुल गांधी यांच्या समवेत हाथरसला जाण्याचा प्रयत्न करू नये म्हणून ही उपाययोजना केली गेली आहे.
उत्तरप्रदेश पोलिसांच्या या दडपशाहीचा लल्लू यांनी निषेध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे सरकार आता गुंडागर्दीवर उतरले आहे या विषयी लोकांच्या मनात कोणताही संभ्रम राहिलेला नाही. सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांच्या सर्व कृत्यांमधून स्पष्ट झाले आहे असेही त्यांनी नमूद केले.
प्रदेश कॉंग्रेसने ट्विटरवर म्हटले आहे की सरकारने केवळ प्रदेशाध्यक्षांवरच नव्हे तर असंख्य कॉंग्रेस कार्यकर्त्यांवरही दडपशाही चालवली असून त्यांनी पाचशेहून अधिक कॉंग्रेस कार्यकर्ते स्थानबद्ध केले आहेत.