लखनौ : उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या 9 जागांसाठीची पोटनिवडणूक अतिशय महत्वाची आहे. केवळ ती पोटनिवडणुकच नव्हे; तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकही भाजप गमावेल. त्यानंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांची खुर्ची गमावतील, असा दावा समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला. उत्तरप्रदेशात पोटनिवडणुकीसाठीच्या एका प्रचार सभेत अखिलेश बोलत होते. एकीकडे योगी समाजात द्वेष पसरवत आहेत. तर, दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील लोक त्यांना हटवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे म्हणत त्यांनी लोकसभा निवडणूक निकालाचा संदर्भ दिला. त्या निवडणुकीत उत्तरप्रदेशातील जनतेने विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला कौल दिला आणि भाजपला दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष बनवून टाकले. त्या निकालापासून भाजपच्या नेत्यांची झोप उडाली आहे, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. उत्तरप्रदेशातील जनतेने पोटनिवडणुकीतही इंडिया आघाडीच्या पाठिशी उभे रहावे. आताची पोटनिवडणूक उत्तरप्रदेशात 2027 यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी संदेश देणारी ठरेल, असेही अखिलेश म्हणाले. उत्तरप्रदेशात पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होईल. तर, निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येईल.