राष्ट्राच्या विकासासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

नागपूर : विद्यार्थ्यांनी देशात करिअर घडवून आपल्या ज्ञानाचा उपयोग देश घडविण्यासाठी राष्ट्राच्या विकासासाठी करावा, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे केले.
कविवर्य सुरेश भट सभागृहात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 109 वा पदवीदान दीक्षांत समारंभात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु, डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, विद्यापीठाचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यावेळी उपस्थित होते.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन विकासाच्या संधी देशात निर्माण होत आहेत. उच्च शिक्षण घेतल्यानंतर आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ आपल्या देशवासियांना कसा होईल यादृष्टीने युवकांनी विचार करावा तसेच देशात नवनिर्मितीच्या माध्यमातून आपले करिअर घडवावे असेही यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्यशास्त्राचे प्रा. दयाराम परतूमल लालवाणी यांना मानव विज्ञान पंडित (डि.लिट) प्रदान करण्यात आली. या पदवीदान दीक्षांत समारंभात 532 विविध विषयातील विद्यार्थ्यांना पदवी, या मध्ये सायन्स अँड टेक्नालॉजी-190, वाणिज्य आणि व्यवस्थापन-79, मानव विज्ञान – 186 व आंतर विद्या शाखा -77 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.





