मुंबईच्या आदेशाने आंदोलकांवर बळाचा वापर; शरद पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

जालना – येथील घटना गंभीर आहे. संकटात असलेल्या लोकांना दिलासा देण्याची गरज आहे. हवा तसा बळाचा वापर जालना येथील घटनेत करण्यात आला. आंदोलनात काही मार्ग निघेल याची चर्चा सुरू होती, सर्व व्यवस्थित सुरू असताना पोलिसांना सूचना आल्या आणि पोलिसांनी निर्णय बदलून सरळ सरळ बळाचा वापर करत लाठी हल्ला केला. मुंबईहून आदेश आल्यावर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
जालना येथील घटनेनंतर शरद पवार यांनी थेट रुग्णालय गाठत जखमी आंदोलकांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी मराठा आंदोलकाना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.
शरद पवार म्हणाले, जालना येथे घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. हा प्रकार जालना जिल्ह्यापुरता मर्यादित न रहाता इतर ठिकाणी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमी लोकांना भेटलो. आश्चर्य वाटेल असा बळाचा वापर या ठिकाणी करण्यात आला. स्त्रिया, लहान मुले यांना सुद्धा पाहिले नाही.
आंदोलन शांततेने व्हावे, कायदा हातात घेण्याचे काम कोणी करू नये. चर्चा सुरू असताना एकदम लाठीहल्ला केला, त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असतील तर त्याची जबाबदारी ज्यांनी निर्णय घेतला त्यांची आहे. जखमी लोक आणि आंदोलकांनी सांगितले की, पोलिसांना वरून आदेश देण्यात आले.
पोलिसांवर हल्ला झाला नाही, पोलिसांकडून हल्ला झाला. मात्र यात पोलिसांना मी दोष देणार नाही. त्यांना ज्यांनी आदेश दिला? याची उच्चस्तरीय नाही तर यासाठी न्यायालयीन चौकशीची गरज आहे. आंदोलकांना शांतता प्रस्थपित करण्याचे मी आवाहन केले, जाळपोळ करू नये, असेही शरद पवार म्हणाले.





