ओतूरमध्ये विनामास्क फिरणाऱ्यांना पोलिसांचा हिसका ओतूर (पुणे)- सध्या करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामीण भागात सर्वत्र शासन प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे काटेकोर पालन करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज आहे. याचाच एक भाग म्हणून ओतूर पोलिसांची मास्क न वापरणाऱ्यांना दंडात्मक कारवाई करून धडक मोहीम सुरू असल्याचे ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले. या कारवाईमुळे ओतूर आणि परिसरात एव्हाना बिगर मास्क फिरणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे. तर विनाकारण फिरणाऱ्या फिरस्त्यांना चांगलाच हिसका देखील दाखवला जात आहे. सध्या ओतूर गावची करोना रुग्ण सख्या पाहता अतिशय चिंतनीय बाब असल्याचे समोर आलेले आहे यात जर गावात काळजी घेतली गेली नाही तर हा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात. ही चिंता वाढत असताना मात्र नागरिक विनाकारण फिरतात, मास्कचा वापर करीत नाहीत. याबाबत जनतेला गांभीर्य नाही की काय असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. शक्यतो विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कशिवाय फिरू नये, रुमाल किंवा इतर कोणतेही कापड तोंडाला बांधून फिरताना आढळणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. चार चाकी वाहनांमध्ये फिरताना एक चालक आणि दोघेजण प्रवास करावा. सर्वांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. -आकाश शेळके, पोलीस उपनिरीक्षक ओतूर