अमेरिकेची अफगाणिस्तानातील माघार पूर्ण; काबूल विमानतळाचा तालिबान्यांनी घेतला ताबा

काबूल – अमेरिकेने अफगाणिस्तानातून आज माघारीची प्रक्रिया पूर्ण केली. गेली 20 वर्ष अमेरिका आणि नाटोच्या फौजा अफगाणिस्तानात वास्तव्याला होता. हे युद्ध आता संपले आहे, अशी घोषणा करीत अमेरिकेने आज तेथील आपली माघारीची प्रक्रिया त्यांच्या उद्दिष्ठानुसार साध्य केली.
त्या घटनेचा तालिबान्यांनी जल्लोष करीत विजयोत्सव साजरा केला आहे. विमानतळाच्या धावपट्टीवर जाऊन तालिबानी नेत्यांनी हा प्रतिकात्मक विजय साजरा करताना हा विजय म्हणजे आमच्या देशावर आक्रमण करणाऱ्यांना मिळालेला धडा आहे, असे तालिबान्यांनी म्हटले आहे.
अफगाणिस्तानातून 31 ऑगस्टपर्यंत लष्कर पूर्ण मागे घेतले जाईल, अशी घोषणा अमेरिकेने केली होती. त्यानुसार त्यांचे शेवटचे विमान काल रात्री येथून रवाना झाले. त्यामुळे काबूल विमानतळावर आता पूर्ण शांतता असून तो जवळपास निर्मनुष्य झाला आहे. तालिबानने काबूलचा ताबा घेतल्यापासून कालपर्यंत तेथून एकूण 1 लाख 23 हजार नागरिकांना अफगाणिस्तानच्या बाहेर नेण्यात आले आहे.
त्यात सहा हजार अमेरिकन नागरिकांचा समावेश आहे. अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात अवघड जबाबदारी होती तेथे साधनसामग्रीची तयारी ठेवत समन्वयाने हे काम करण्यासाठी मोठे कष्ट पडले आहेत, असे अमेरिकेचे परराष्ट्रंमत्री ब्लिंकेन यांनी म्हटले आहे. त्यांनी जाहीर केले की आता आमचे काबूलमधील डिप्लोमॅटिक अस्तित्व संपले आहे. हे काम आम्ही दोहा, कतार येथे हलवले आहे त्याची अधिसूचना लवकरच जाहीर होईल, असेही ब्लिंकेन यांनी जाहीर केले. आता तालिबानने अफगाणिस्तानात कोणत्याही दहशतवादी संघटनांना आश्रय देऊ नये आणि त्यांच्या भूमीवरून अन्य देशांवर हल्ले करण्याची कारस्थाने रचली जाऊ नयेत अशी सूचनाही ब्लिंकेन यांनी अफगाणिस्तानला केली आहे.
दरम्यान अमेरिकेचे शेवटचे विमान येथून रवाना झाल्यानंतर काबूल विमानतळावर आता बहुतांशी पूर्ण शांतता आहे. तालिबान्यांनी या विमानतळाचा पूर्ण ताबा घेतला आहे. काबूल त्यांच्या ताब्यात आले असले तरी विमानतळाचा ताबा मात्र अमेरिकन फौजांकडेच होता. अमेरिकेचे सुमारे शंभरावर जवान अजूनही अफगाणिस्तानात उरले आहेत. त्यांनाही तेथून परतायचे आहे असेही त्यांनी नमूद केले. अमेरिकन नागरिकांबरोबरच ज्या अफगाणि नागरिकांनी आम्हाला मदत केली त्यांनाही आम्ही तेथून परत आणले आहे असे ते म्हणाले.





