जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) होणाऱ्या G-20 शिखर परिषदेत (G-20 Summit) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सहभागी होणार नाहीत. अमेरिकेचे प्रतिनिधी केवळ परिषदेच्या शेवटच्या दिवशी औपचारिक एका समारंभात उपस्थित राहतील, असे व्हाईट हाऊसने (White House) स्पष्ट केले आहे. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे २२-२३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या G-20 शिखर परिषदेत ट्रम्प यांचा सहभाग नसेल. यावेळी परिषदेचे अध्यक्षपद अमेरिकेला मिळणार आहे. रामाफोसा यांच्या वक्तव्याने ट्रम्प संतप्त- व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट (Karoline Leavitt) यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा (Cyril Ramaphosa) यांच्या अलीकडच्या वक्तव्यांमुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांची टीम नाराज आहे. लेविट म्हणाल्या, “दक्षिण आफ्रिकेतील G-20 च्या अधिकृत चर्चांमध्ये अमेरिका सहभागी होणार नाही. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष अमेरिका आणि राष्ट्राध्यक्षांविरुद्ध जी भाषा वापरत आहेत, ती ट्रम्प आणि त्यांच्या टीमला अजिबात आवडलेली नाही.” रामाफोसा यांनी व्हिडिओतून काय म्हटले? रामाफोसा यांनी नुकताच एक व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला होता, ज्यात त्यांनी म्हटले होते की, “बहिष्काराचे राजकारण काम करत नाही. G-20 च्या तंबूबाहेर उभे राहण्यापेक्षा आत राहणे केव्हाही चांगले.” याशिवाय, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन (Ursula von der Leyen) आणि युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा (Antonio Costa) यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेतही त्यांनी संकेत दिले की, अमेरिकेने बहिष्कार टाकण्याचे जाहीर करूनही बैठकीत कोणत्याही स्वरूपात सहभागासाठी चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांनी बहिष्कार का टाकला होता? डोनाल्ड ट्रम्प यांनी या महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केले होते की, जोहान्सबर्ग येथील G-20 परिषदेत कोणताही अमेरिकन अधिकारी सहभागी होणार नाही. ट्रम्प यांनी या बहिष्काराचे कारण दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या अल्पसंख्याक शेतकऱ्यांवरील कथित हिंसाचार हे दिले होते. दक्षिण आफ्रिकेने ट्रम्प यांचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. राष्ट्राध्यक्ष रामाफोसा म्हणाले की, अमेरिकेचा हा बहिष्कार म्हणजे परिषदेच्या शेवटी त्यांना अध्यक्षपद ‘रिकाम्या खुर्चीला’ सुपूर्द करण्यासारखे असेल. त्यामुळे समिटपूर्वीच दोन्ही देशांमधील संबंधात तणाव निर्माण झाला आहे.