वॉशिंग्टन – रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणात जर चीनने रशियाला ठोस मदत पुरवली तर त्याचे परिणाम भोगण्याची तयारी ठेवावी, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दिल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. तर दोन्ही नेत्यांनी या पेचप्रसंगावर राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याच्या मुद्द्यावर भर दिला असल्याचे त्यांच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
व्हाईट हाऊसच्या निवेदनात चीनला कोणते परिणाम भोगावे लागू शकतात, याचा उल्लेख केला नाही किंवा ठोस मदतीची व्याख्या स्पष्ट केलेली नाही. मात्र व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जेन पास्की यांनी चीनच्या व्यापरावर परिणाम होऊ शकतो, असे संकेत दिले.
जगातील सर्वात मोठा निर्यादार असणाऱ्या चीनवर निर्बंध आणणार का? असे विचारता दैनंदिन वार्तालापात पास्की म्हणाले, या हत्यारांच्या पेटीतील एक हत्यार निर्बंध हे असू शकते. बायडेन आणि शी जीनपिंग यांच्यात सुमारे दोन तास चर्चा झाल्यानंतर पास्की म्हणाले, आमचे युरोपीयन भागीदार आणि अन्य सहकारी राष्ट्राच्या सहाय्याने बिजिंगवर थेट परिणाम होउ शकेल, असा इशारा चीनला देण्यात आला आहे.
जगातील सर्व राष्ट्रांनी रशियाला या आक्रमणाची किंमत मोजायला लावावी, असा आग्रह अमेरिका धरत असल्याच्या पार्श्वभूमीवर जगातील दोन्ही महासत्तांच्या प्रमुखांमध्ये ही चर्चा झाली.
रशिया युक्रेन आणि त्याच्या नागरिकांवर संहारक हल्ले करत असल्याने त्याला ठोस मदत केली तर चीनला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असे व्हाईट हाउसच्या निवेदनात म्हटले आहे. त्याच वेळी बायडेन या पेचप्रसंगातून राजनैतिक तोडग्याच्या प्रयत्नांना असणारा अमेरिकेचा पाठींबा बायडेन यांनी यावेळी अधोरेखित केला.
एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चीनला बायडेन यांनी कोणतीही निश्चित विनंती केली नाही. आम्हाला वाटते चीनने त्यांचा निर्णय स्वत: घ्यावा. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिनपिंग यांनी सांगितले की, युक्रेनमधील युध्द तातडीन थांबायला हवे. त्यासाठी नाटो राष्ट्रांनी रशियाशी चर्चा करावी. मात्र जिनपिंग यांनी या आक्रमणाबद्दल रशियाल दोषी ठरवले नाही. नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी संवाद आणि चर्चेला या काळात सर्वाधिक महत्त्व द्यायला हवे. मानवी आक्रोश थांबवण्यासाठी युध्द तातडीने थांबवायला हवे, असे जिनपिंग म्हणाले.