वॉशिंग्टन: अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हेन्स यांच्या ओहायो येथील निवासस्थानावर सोमवारी पहाटे अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून, सीक्रेट सर्विसने एका संशयित व्यक्तीला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. सुदैवाने, हल्ल्याच्या वेळी जे.डी. वेन्स घरात उपस्थित नव्हते. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, जे.डी. वेन्स यांचे वॉशिंग्टन डीसीच्या बाहेरील भागात म्हणजेच ओहायोमधील ‘ईस्ट वॉलनट हिल्स’ येथे घर आहे. सोमवारी पहाटे एक व्यक्ती अचानक त्यांच्या घराच्या आवारात घुसली आणि त्याने घराच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, या व्यक्तीने घरात घुसून तोडफोड करण्याचाही प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच सीक्रेट सर्विसचे एजंट आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित व्यक्तीला बेड्या ठोकल्या. हल्ल्याचे कारण अस्पष्ट हा हल्ला कोणत्या उद्देशाने करण्यात आला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास यंत्रणा सध्या या व्यक्तीची चौकशी करत असून, उपराष्ट्रपतींच्या सुरक्षेतील त्रुटींचाही आढावा घेतला जात आहे. वेनेझुएलावरील लष्करी कारवाईचे केले होते समर्थन – विशेष म्हणजे, हा हल्ला होण्यापूर्वी काही तास आधीच जे.डी. वेन्स यांनी वेनेझुएलामध्ये अमेरिकेने केलेल्या लष्करी कारवाईचे जोरदार समर्थन केले होते. “वेनेझुएला अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये गुंतलेला असून, जप्त केलेल्या तेल मालमत्तेचा वापर ‘नार्को-टेररिस्ट’ कारवायांसाठी केला जात आहे,” असा आरोप वेन्स यांनी केला होता. या संदर्भात ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करताना वेन्स यांनी म्हटले होते की, “कोकेन तस्करी हा लॅटिन अमेरिकन ड्रग्ज कार्टेलच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. जर आपण कोकेनमधून मिळणारा पैसा रोखला, तर आपण या गुन्हेगारी टोळ्यांना मोठ्या प्रमाणावर कमकुवत करू शकतो.” वेनेझुएलाबाबत घेतलेल्या या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घरावर झालेला हा हल्ला राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.