मुंबई हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणाला दणका, न्यायालयाने पुन्हा फेटाळली याचिका; प्रत्यार्पणाचा मार्ग झाला मोकळा

Tahawwur Rana | 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाचा भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा राणाची याचिका फेटाळली आहे. राणाने सर्वोच्च न्यायालयात आपातकालीन याचिका दाखल केले होते. यामध्ये म्हटले आहे की, मुस्लिम आणि पाकिस्तानी वंशाचा असल्याने त्याचा भारतात छळ केला जाईल. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.
राणाने अमेरिकेच्या सर्किटच्या असोसिएट जस्टिससमोर “आपातकालीन स्थगित याचिका” दाखल केली होती. ‘भारताला त्याचे प्रत्यार्पण केल्यास अमेरिकेच्या कायद्यानुसार आणि संयुक्त राष्ट्रांच्या अत्याचार विरोधी कराराचे उल्लंघन होईल, असे त्याने याचिकेत म्हटले होते.
13 फेब्रुवारीला त्याच्या वतीने दाखल केलेली याचिकेतीलबाबी स्पष्ट होईपर्यंत प्रत्यार्पण रोखण्यात यावे. तसेच, तो मूळ पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम असल्याने भारतात छळ केला जाऊ शकतो. गंभीर आरोग्य स्थिती लक्षात घेता भारताकडे सोपवल्यास हे मृत्यूची शिक्षा देण्यासारखेच ठरेल, असेही त्याने म्हटले आहे. मात्र, आता न्यायालयाने याचिका फेटाळल्याने प्रत्यार्पण रोखण्याचा त्याचा प्रयत्न अपयशी ठरला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वूर राणाला भारताकडे सोपवले जाणार असल्याची माहिती दिली होती. ‘आमच्या प्रशासनाने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या दोषी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणास मंजुरी दिली आहे. आता तो भारतात जाऊन न्यायाला सामोरे जाईल.’, असे ट्रम्प त्यावेळी बोलताना म्हणाले होते.
कोण आहे तहव्वूर राणा?
तहव्वुर हुसेन राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे. आधी तो पाकिस्तानमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता. त्यानंतर कॅनडाला गेला. त्यानंतर तो अमेरिकेला गेला व तेथे फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस नावाची कन्सल्टन्सी फर्म सुरु केली.
मुंबई पोलिसांनी 26/11 च्या हल्ल्यासंदर्भात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये राणाच्या नावाचा समावेश केला होता. त्याच्यावर पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेज इंटेलिजन्स आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा सदस्य म्हणून काम केल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. त्याने या हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडलीची मदत केल्याचाही आरोप केला होता.
एफबीआयने 26/11 च्या हल्ल्यानंतर 1 वर्षानंतर राणाला शिकागोमध्ये अटक केली होती. राणाने डेव्हिड हेडलीसोबत मिळून मुंबई हल्ल्यातील ठिकाणांची रेकी केली होती.





