वॉशिंग्टन – करोनामुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेत छोट्या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी तसेच करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटल्सना मदत करण्यासाठी अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने 483 अब्ज डॉलर्सचे आणखी एक पॅकेज जाहीर केले असून त्या प्रस्तावाला अमेरिकन संसदेने मान्यता दिली आहे. ट्रम्प यांनी या खेरीजही आणखी मदत देण्याची तयारी दर्शवली असून त्यासाठीची योजना तयार केली जात आहे. करोनाची समस्या उद्भवल्यापासून अमेरिकेत जाहीर झालेले हे चौथे पॅकेज आहे.
आज मंजूर झालेल्या पॅकेज पैकी 331 अब्ज डॉलर्स छोटे व्यावसायिक आणि उद्योजक यांना दिले जाणार आहेत. यातून त्यांना अनुदाने आणि कर्जे दिली जाणार आहेत. त्या खेरीज रुग्णालयांना 75 अब्ज डॉलर्स आणि करोना चाचणीसाठी 25 अब्ज डॉलर्सची मदत दिली जाणार आहे. अमेरिकेने नागरिकांच्या करोना चाचण्या वाढवण्यावर सध्या भर दिला आहे.
आत्तापर्यंत त्या देशातील चाळीस लाख लोकांच्या करोना चाचण्या झाल्या आहेत. करोना प्रतिबंधांमुळे ज्यांचे व्यवसाय बंद आहेत त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचा पगार देता यावा तसेच ज्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केले आहे त्यांचाही पगार व्हावा म्हणून संबंधीतांना कर्जाऊ स्वरूपात ही मदत दिली जाणार आहे. ग्रामीण भागातील वित्तीय संस्थांना गरूजांना मदत करता यावी म्हणूनही सरकारने 60 अब्ज डॉलर्सची तरतूद करून ठेवली आहे.