चीनच्या Deepseek AIमुळे अमेरिकेत खळबळ; NVIDIAचा शेअर कोसळला, गुंतवणूकदारांचे 593 अब्ज डॉलरचे नुकसान

नवी दिल्ली – चीनमधील एका छोट्या स्टार्ट अपने डीपसिक नावाचा कमी किमतीचा ए आय असिस्टंट या आठवड्यात जारी केल्यानंतर अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अब्जावधी डॉलर खर्च करून विकसित केलेले कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान फिक्के पडले आहे. यामुळे अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या एनव्हिडिया कंपनीचा शेअर एकाच दिवसात तब्बल 17 टक्क्यांनी कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल 593 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.
त्याचबरोबर नॅशडॅक या अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांचा शेअर बाजार एकाच दिवसात 3.1 टक्क्याने कोसळला. चॅट बॉटला वित्तपुरवठा करणार्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचा शेअर दोन टक्क्यांनी आणि अल्फाबेट कंपनीचा शेअर 4.2 टक्क्यानी कोसळला. सेमीकंडक्टर चीप तयार करणार्या ब्रॉडकॉम कंपनीचा शेअर तब्बल 17.4 टक्क्यांनी कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील नेतृत्वाबाबत शंका निर्माण झाल्या आहेत.
वॉलस्ट्रिटवर सन्नाटा –
वॉल स्ट्रीटवर एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच नुकसान झाले आहे. अमेरिकेची कृत्रिम बुद्धिमत्ता अॅप अब्जावधी डॉलर खर्च करून तयार करण्यात आली आहेत. तर चिनी अॅप अतिशय कमी किमतीत तयार करण्यात आलेले आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, चीन, सिंगापूर येथील ग्राहकांनी चॅट जीपीटी ऐवजी डीप सिकचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. डीपसिकचे वापर कर्ते वाढले आहेत. डीप सिकचे सध्या दोन प्रकार उपलब्ध आहेत आणि या दोन्ही प्रकारांची कार्यक्षमता अमेरिकेच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे व किंमत नाममात्र आहे.
चीनी तंत्रज्ञान अतिशय स्वस्त –
डीप सिकच्या संचालकांनी सांगितले की त्यांनी वापरलेली चिप केवळ सहा दशलक्ष डॉलरची आहे. तर अमेरिकन कंपन्या वापरत असलेली यंत्रणा अब्जावधी डॉलरची आहे. त्यामुळे अमेरिकेच्या कृत्रीम बुद्धिमत्ता क्षेत्राचे होकायंत्र चुकीचे आहे, असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. अमेरिकेने गर्विष्ठपणे गेल्या पंधरवड्यात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र चीनमध्ये असलेले तंत्रज्ञान अमेरिकन तंत्रज्ञानापेक्षा कितीतरी स्वस्त आहे आणि खुले आहे. त्यामुळे अमेरिकेचे निर्यात बंदी निरुपयोगी ठरण्याची लक्षणे आहेत. याचा परिणाम ओपन एआय कंपन्यावर होण्याची शक्यता आहे.
अमेरीकेचे गर्वहरण –
विश्लेषकांनी सांगितले की, चीनमध्ये अतिशय कमी किमतीत डीप सिक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे अमेरिकेतील कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी अब्जावध डॉलर का गुंतवावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. चीनने अमेरिकेचे गर्वहरण केल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. चिनने कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान सर्वाना उपलब्ध केले आहे. ते जगातील कोणालाही वापरता येणे शक्य आहे. त्यांना त्यासाठी कसलीही किंमत मोजावी लागणार नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या प्रकारची दखल घेतली आहे. अमेरिकन कंपन्यानी आता झोपेतून उठण्याचा गरज आहे असे सांगितले आहे.
ओपन एआयकडून दखल –
दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अमेरिकेत आघाडीवर असलेल्या ओपन एआयचे संस्थापक सॅम अल्टमन यांनीही चीनचे एआय मॉडेल किफायतशीर आहे, असे मान्य केले आहे. आम्हाला चांगला स्पर्धक मिळाला असून आम्ही आगामी काळात आमच्या स्पर्धकापेक्षा उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.





