US-Iran War: अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानने केलेली मध्यस्थी सध्या तरी अपयशी ठरल्याचे चित्र आहे. पाकिस्तानच्या यजमानपदाखाली झालेली २० तासांची प्रदीर्घ चर्चा कोणत्याही ठोस निर्णयाविना संपल्यानंतर, आता सर्वांचे लक्ष पुढील घडामोडींकडे लागले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधात ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’च्या नाकाबंदीसह कठोर रणनीती जाहीर केल्याने पश्चिम आशियात युद्धाचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय विश्लेषकांनी भविष्यातील संघर्षाच्या चार मुख्य शक्यता वर्तवल्या आहेत. १. नाजूक युद्धविराम: रणनीतिक विश्रांती की तयारी? सध्या सुरू असलेला दोन आठवड्यांचा युद्धविराम हा केवळ ‘वेळकाढूपणा’ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. वॉशिंग्टनस्थित ‘फाउंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रेसीज’चे बेहनाम बेन तालेब्लू यांच्या मते, अमेरिका आणि इराणमधील धोरणात्मक मतभेद इतके खोल आहेत की, युद्धविराम कायमस्वरूपी टिकण्याची शक्यता कमी आहे. हा काळ दोन्ही पक्षांसाठी आपली सैन्यशक्ती पुन्हा संघटित करण्यासाठी एक ‘रणनीतिक विराम’ असू शकतो. जर चर्चा यशस्वी झाली नाही, तर अमेरिका इराणच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ले करू शकते, तर इस्रायलकडून इराणी अधिकाऱ्यांच्या हत्येसारखी मोठी कारवाई होण्याची भीती आहे. हेही वाचा – दिल्ली विमानतळावर दोन विमानांची धडक २. ‘शॅडो वॉर’ (छुप्या युद्धाचा धोका) संघर्ष पूर्णतः थांबण्याऐवजी तो ‘नियंत्रित तणावा’च्या स्थितीत राहण्याची शक्यता अधिक आहे. यात थेट युद्ध न होता, एकमेकांच्या लष्करी तळांवर किंवा पुरवठा साखळीवर मर्यादित हल्ले केले जाऊ शकतात. इराण आपल्या ‘प्रॉक्सी’ गटांमार्फत (उदा. येमेनमधील हुती बंडखोर) अमेरिकेवर दबाव वाढवू शकतो. यालाच विश्लेषक ‘शॅडो वॉर’ असे संबोधत आहेत. ३. पडद्यामागून कूटनीती सुरूच राहणार – पाकिस्तानमधील चर्चा अपयशी ठरली असली तरी कूटनीतीचे दरवाजे पूर्णपणे बंद झालेले नाहीत. कतार, ओमान, सौदी अरेबिया आणि इजिप्त यांसारखे देश मध्यस्थ म्हणून सक्रिय होऊ शकतात. मात्र, अमेरिकेचा १५ कलमी प्रस्ताव आणि इराणचा १० कलमी प्रति-प्रस्ताव यांच्यातील अंतर पाहता, नजीकच्या भविष्यात कोणताही मोठा करार होणे कठीण वाटते. ४. समुद्री नाकाबंदी आणि जागतिक संकट – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केलेली ‘स्ट्रीट ऑफ होर्मुझ’ची नाकाबंदी हा सर्वात धोकादायक टप्पा ठरू शकतो. इराणचे तेल उत्पन्न रोखणे आणि चीनला होणारा पुरवठा खंडित करणे हा यामागचा उद्देश आहे. मात्र, या नाकाबंदीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात. प्रत्युत्तर म्हणून इराणनेही खाडी क्षेत्रात समुद्री वाहतूक विस्कळीत करण्याची धमकी दिली आहे. अस्थिरतेचा नवा टप्पा – सध्याची परिस्थिती पाहता, अमेरिका आणि इराण अशा टप्प्यावर पोहोचले आहेत जिथे ‘युद्ध’ आणि ‘शांतता’ यातील रेषा पुसट झाली आहे. याला तज्ज्ञ ‘ग्रे-झोन’ किंवा ‘संरचनात्मक अस्थिरता’ म्हणत आहेत. लष्करी कारवाई आणि राजनैतिक चर्चा या दोन्ही गोष्टी समांतरपणे सुरू राहतील, असेच सध्याचे चित्र आहे.