US Iran Peace Deal: इराणला ३०० अब्ज डॉलर्स देण्याच्या चर्चेवरून ट्रम्प संतापले ; म्हणाले, ‘हे खोटं आहे, इराण कधीही…’
US Iran Peace Deal: अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.

US Iran Peace Deal: अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. या शांतता कराराचा भाग म्हणून अमेरिका इराणला ३०० अब्ज डॉलर्सची मदत देईल. असा दावा करण्यात आला होता.
आता, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत इराणने अण्वस्त्रे न बाळगण्यास सहमती दर्शवल्याचेही जाहीर केले आहे.
ट्रम्प काय म्हणाले? US Iran Peace Deal:
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये लिहिले, “इराणने अण्वस्त्रे न बाळगण्यास सहमती दर्शवली आहे! तसेच, अमेरिका इराणला ३०० दशलक्ष डॉलर्स देत असल्याची बातमी खोटी असून, ती डेमोक्रॅट्सनी पसरवली आहे!”असा आरोप देखील केला आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करार आणि युद्ध समाप्तीच्या घोषणेनंतर ट्रम्प यांचे हे विधान आले आहे. इराणच्या अणुकार्यक्रमावर आणि निर्बंध शिथिल करण्यावर वाटाघाटी करण्यासाठी एका प्राथमिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. मात्र, या कराराचा तपशील अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी युद्धविरामाबाबतही वाटाघाटी सुरू आहेत.
जे.डी. व्हान्स यांची प्रशंसा US Iran Peace Deal:
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनीही इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखण्याच्या ट्रम्प यांच्या कराराची प्रशंसा केली. ते म्हणाले की, ट्रम्प यांच्या राजनैतिक प्रयत्नांना पुन्हा एकदा यश आले आहे आणि इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखणे हे या कराराचे मुख्य उद्दिष्ट आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओ संदेशात व्हान्स म्हणाले, “इराण कधीही अण्वस्त्रे बाळगणार नाही, हे राष्ट्रपतींनी पहिल्या दिवसापासून स्पष्ट केले आहे. अमेरिका आणि राष्ट्रपती ट्रम्प यांचा द्वेष करणाऱ्यांनी यात अडथळा आणण्याचे असंख्य प्रयत्न करूनही, राष्ट्रपती ट्रम्प यांच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा अमेरिकन जनतेला पुन्हा एकदा फायदा झाला आहे.”
या आठवड्याच्या अखेरीस जिनिव्हा येथे या करारावर औपचारिकपणे स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. अमेरिका, इराण, पाकिस्तान आणि कतार यांच्यासोबत स्वित्झर्लंडही हा करार पूर्ण करण्याची तयारी करत आहे. राष्ट्रपती ट्रम्प यांनी या कराराचे वर्णन “एक अत्यंत शक्तिशाली दस्तऐवज” असे केले आहे आणि स्वाक्षरी समारंभानंतर त्याचा मसुदा सार्वजनिक केला जाईल, असे संकेत दिले आहेत.






