भारतीय निवडणुकांमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप? बसपा प्रमुख मायावती यांचा गंभीर दावा

नवी दिल्ली – अमेरिकेच्या भारताला मदत थांबवण्याच्या निर्णयानंतर बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी मोठा दावा केला आहे. राजधानी दिल्लीत एका आढावा बैठकीत बसपा प्रमुखांनी पक्षाचे कार्यकर्तेआणि नेत्यांची भेट घेतली.
भारतात मतदारांची संख्या वाढवण्याच्या नावाखाली २१ दशलक्ष डॉलर्सची मोठी रक्कम मिळाल्याची अमेरिकेतून आलेली बातमी खूपच धक्कादायक आहे. देशातील जनतेने हे स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांमध्ये हस्तक्षेप आहे का आणि जर तसे असेल तर त्याचा फायदा कोणाला होत आहे याबद्दल सतर्क असले पाहिजे असे मायावती यांनी म्हटले आहे.
बसपाने जारी केलेल्या निवेदनात अमेरिकेतून भारतात येणाऱ्या लोकांचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. बसपाच्या प्रेस रिलीजनुसार, मायावती म्हणाल्या या संदर्भात, अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरित घोषित केल्याच्या बहाण्याने शेकडो भारतीयांना बेड्या घालून घरी परत पाठवण्याची घटना अत्यंत दुःखद आणि चिंताजनक आहे.
केंद्र सरकारने अमेरिकेसारख्या मैत्रीपूर्ण देशातून, पंजाब, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमधून आलेल्या भारतीय नागरिकांच्या या अमानवीय परतीची योग्य दखल घ्यावी आणि यावर उपाय शोधावा.





