US Election 2024: बहुतांश सर्वेक्षणात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आघाडी

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना, उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोघेही लोकप्रिय मतांमध्ये 48 टक्के बरोबरीत आहेत, न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या अंतिम राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार, शर्यत अत्यंत चुरशीची दिसते आहे.
न्यूयॉर्क टाईम्सच्या मते, सर्वेक्षणाचे निकाल हॅरिस यांच्यासाठी उत्साहवर्धक नाहीत कारण ते निवडणुकीच्या केवळ दोन आठवड्यांपूर्वी आले आहेत आणि संपूर्ण अमेरिकेतील लाखो लोकांनी आधीच मतदान केले आहे. अमेरिकेत ५ नोव्हेंबर रोजी निवडणुका होणार आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनून इतिहास रचण्याचे ध्येय ठेवले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात युद्ध सुरू आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन्ही उमेदवार एकमेकांना लक्ष्य करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत कमला हॅरिस यांना ज्यो बायडेन म्हटले आहे.
वॉल स्ट्रीट म्हणते ट्रम्प पुढे –
न्यूयॉर्क टासम्सने जरी लोकप्रिय मतांमध्ये दोन्ही उमेदवार बरोबरीत असल्याचे दाखवले असले तरी अन्य सर्वेक्षणांत ट्रम्प हे कमला हॅरिस यांच्यावर किंचित आघाडी राखत असल्याचे म्हटले आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलने केलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, ट्रम्प हॅरिस यांच्यापेक्षा दोन टक्के मतांनी पुढे आहेत.
त्यांनी ट्रम्प ४७ तर हॅरिस ४५ असा रेशो दाखवला आहे.सीएनबीसी ऑल-अमेरिका इकॉनॉमिक सर्व्हेनुसार, डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. ऑगस्टपासून हीच स्थिती असल्याचा दावा त्यांनी केला आहे. वृत्तवाहिनीने म्हटले आहे की, अमेरिकेतील सात महत्त्वाच्या राज्यांमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हॅरिस यांच्यापेक्षा पुढे आहेत.
अमेरिकेच्या सर्व प्रमुख राष्ट्रीय आणि प्रादेशिक सर्वेक्षणांवर नजर ठेवणाऱ्या रियलक्लियर पॉलिटिक्सनुसार, उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना राष्ट्रीय स्तरावर ट्रम्प यांच्यापेक्षा ०.३ टक्के गुणांची थोडीशी आघाडी आहे. दुसरीकडे, देशातील सात महत्त्वाच्या राज्यांमध्ये ट्रम्प ०.९ टक्के गुणांनी पुढे आहेत.





