नवी दिल्ली – सूत्रांचा हवाला देऊन वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दहा डिसेंबर रोजी अमेरिकेचे व्यापार सिष्टममंडळ भारतात येणार आहे. यावेळी शिष्टमंडळ पातळीवर तीन दिवसाची चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतात. जानेवारीपूर्वी किमान प्राथमिक स्वरूपाचा व्यापार करार दोन्ही देशात व्हावा यासाठी फेब्रुवारी महिन्यापासून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र यामध्ये अनेक वेळा अडथळे आले आहेत. सूत्रानी सांगितले की दहा डिसेंबरला चर्चा सुरू होईल आणि 12 डिसेंबर पर्यंत चालेल. अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व अमेरिकेचे वाणिज्य राज्यमंत्री करणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला आठ ऑगस्ट रोजी भारताविरोधात 25% आयात शुल्क लावले होते. त्यानंतर भारत हा रशियाकडून खनिज तेल खरेदी करीत असल्याबद्दल पुन्हा 28 ऑगस्ट रोजी 25% असे एकत्रित 50 टक्के शुल्क लावले आहे. त्यानंतर मतभेद असूनही अमेरिकेचे शिष्टमंडळ 16 सप्टेंबर रोजी भारतात येऊन चर्चा करून गेले. त्यानंतर 22 सप्टेंबर रोजी वाणिज्य मंत्री पियुष यांनी अमेरिकेत जाऊन चर्चा केली होती. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे वाणिज्य सचिव राजेश अग्ररवाल यांनी गेल्या आठवड्यात चर्चा कोणत्या चौकटीत करायची ही बाब निश्चित झाली आहे आणि जानेवारीपूर्वी प्राथमिक स्वरूपाचा करार करण्याबाबत दोन्ही देश आशावादी असल्याचे सांगितले होते. अमेरिकेच्या अध्यक्षपदावर आल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरम्यान फेब्रुवारीमध्ये बैठक झाली होती. या बैठकीत दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार सध्याच्या 191 अब्ज डॉलरवरून 500 अब्ज डॉलर करण्याचा संकल्प करण्यात आला होता. 2024-25 या आर्थिक वर्षात भारत आणि अमेरिकेत दरम्यानचा व्यापार 191 अब्ज डॉलर्सचा होता. आणि जगातील कोणत्याही देशापेक्षा हा व्यापार जास्त आहे. मात्र नंतर अमेरिका आणि भारतादरम्यान विविध कारणावरून मतभेद निर्माण झाल्यामुळे आता गेल्या दोन तिमाहीपासून दोन्ही देशादरम्यानचा व्यापार बराच कमी झाला आहे.