नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अगोदरच 50% आयात शुल्क लावले आहे. त्यानंतर मंगळवारी भारतीय तांदळावर अतिरिक्त आया शुल्क लावण्याची धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे शिष्टमंडळ व्यापार करारावर बोलणी करण्यासाठी राजधानी दाखल झाले आहे. ही बोलणी यशस्वी होईल आणि हा करार लवकरच होईल याबाबत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आशावाद व्यक्त केला आहे. शिष्टमंडळ पातळीवरील ही बोलणी चालू असताना आपण स्वतः अमेरिकेच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. अमेरिकेने भारताविरोधात 50 टक्के आयात शुल्क लावल्यानंतर भारताच्या दुसर्या तिमाहितील परकीय व्यापारावर याचा नकारात्मक परिणाम होत आहे. यामुळे भारताची निर्यात कमी होऊन चालू खात्यावरील तुट वाढत आहे. अशा परिस्थितीत रुपयाच्या मूल्यावर दबाव येत आहे. अमेरिकन डॉलर इतर चलनाच्या तुलनेत कमकुवत होत असतानाच भारतीय चलनाच्या तुलनेत मात्र मजबूत होत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेबरोबर निर्यात वाढविण्यासाठी व्यापार करार होण्याची आवश्यकता निर्यातदार व्यक्त करीत आहेत. मात्र अमेरिकेचे या क्षेत्रातील धोरण विवेकहीन आहे. त्यामुळे हा करार सहजासहजी होत नाही. गोयल यांनी सांगितले की, दोन्ही देश आपल्या हितसंबंधासाठी आग्रही असतात. अशा परिस्थितीत घाईगडबडीत अशा प्रकारचा करार करणे बरोबर नसते. कारण त्यामुळे देशातील निर्यातदारांचे दीर्घ पल्ल्यात नुकसान होण्याची भीती असते. यामुळे उशीर झाला तरी हा करार आपल्या हितसंबंधाचे रक्षण करणारा असावा याबाबत भारत सरकार आग्रही असल्याचे गोयल यांनी सांगितले. भारतीय शेतकरी, मच्छीमार, कापड क्षेत्रातील उद्योजक यांच्या हितसंबंधाला भारत सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. हा करार करताना या क्षेत्राचा बळी दिला जाणार नाही याचा गोयल यांनी वेळोवेळी पुनरुच्चार केलेला आहे.