वॉशिंग्टन – रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने दिलेला प्रस्ताव युक्रेनने स्वीकारला असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. मात्र या प्रस्तावावर अजूनही चर्चा सुरू आहे, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या प्रस्तावाबाबत युक्रेनने सहमती दर्शवली आहे. केवळ काही किरकोळ मुद्द्यांवर सहमती होणे बाकी आहे. युद्धबंदी घडवून आणण्याच्या दृष्टीने ही खूप मोठी प्रगती झाली आहे, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले आहे. ट्रम्प यांनी देखील वाटाघाटींना मोठे यश आल्याचे सोळ मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान या युद्धबंदीच्या प्रस्तावाबाबत अधिक सविस्तर चर्चा करण्यासाठी अमेरिका आणि रशियाचे अधिकारी आबुधाबी येथे चर्चा करणार आहेत. युरोपातल्या नेत्यांबरोबर जिनिव्हा येथे झालेल्या चर्चेचा पाठपुरावा यावेळी करण्यात येणार आहे. मात्र ही चर्चा अजून अंतिम टप्प्यात झालेली नाही. निष्कर्ष अजून निघू शकलेला नाही. काही मुद्द्यांवर स्पष्टता होणे बाकी आहे, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या प्रस्तावामध्ये काही सुधारणा कराव्या लागल्या आहेत. ट्रम्प आणि पुतीन यांच्यात झालेल्या चर्चेला अनुसरून झालेल्या सामंजस्याचे प्रतिबिंब या सुधारणा झालेल्या प्रस्तावामध्ये दिसायला हवे, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे. ट्रम्प आणि पुतीन यांच्यात ऑगस्ट महिन्यातच अलास्का येथे झालेल्या भेटीदरम्यान काही सहमती झाली होती. ही सहमती युद्धबंदीच्या प्रस्तावामध्ये नसल्यास आबुधाबीमध्ये होणाऱ्या चर्चेचे खूप वेगळे वळण मिळेल, असेही लावरोव्ह यांनी म्हटले आहे.