US-China Trade War: ट्रम्प-शी भेटीनंतर अमेरिका-चीनमध्ये मोठा करार; भारताची चिंता का वाढली?
US-China Trade War: अमेरिका आणि चीनमधील दीर्घकाळ सुरू असलेल्या व्यापारयुद्धाला आता काहीसा ब्रेक लागला आहे.

US-China Trade War: अमेरिका आणि चीनमधील दीर्घकाळ सुरू असलेल्या व्यापारयुद्धाला आता काहीसा ब्रेक लागला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी सुमारे 60 अब्ज डॉलरच्या व्यापारावर लागू असलेल्या आयात शुल्कात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या करारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी भारतासाठी त्याचे काही परिणाम होऊ शकतात.
करारानुसार अमेरिका आणि चीन एकमेकांकडून आयात होणाऱ्या सुमारे 30-30 अब्ज डॉलरच्या बिगर-संवेदनशील वस्तूंवरील टॅरिफमध्ये सवलत देणार आहेत. दोन्ही देशांमधील या ‘ट्रेड ट्रूस’ची मुदत 10 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
कोणत्या वस्तूंवरील टॅरिफ कमी होणार? US-China Trade War:
चीन अमेरिकेकडून आयात होणाऱ्या मका, गहू, ज्वारी, मांस, डेअरी उत्पादने, वनस्पती तेल, समुद्री खाद्यपदार्थ, कॉस्मेटिक्स आणि वैद्यकीय उपकरणांवरील शुल्क कमी करणार आहे. याशिवाय 2027 आणि 2028 मध्ये चीन दरवर्षी अमेरिकेकडून 10 मिलियन मेट्रिक टन कोळसा खरेदी करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र, सोयाबीन आणि एलएनजीला या सवलतीतून वगळण्यात आले आहे.
दुसरीकडे, अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या कॉफी मेकर, टोस्टर यांसारख्या छोट्या घरगुती उपकरणांसह भांडी, खेळणी, फटाके, कृत्रिम फुले आणि चादरी यांसारख्या वस्तूंवरील टॅरिफ कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अमेरिकन बाजारात या चिनी वस्तू तुलनेने स्वस्त होऊ शकतात.
अमेरिकेने चीनसोबत तडजोड का केली?
या निर्णयामागे अमेरिकेची आर्थिक आणि धोरणात्मक दोन्ही कारणे असल्याचे दिसते. चिनी वस्तूंवरील शुल्क कमी झाल्यास अमेरिकन बाजारातील काही वस्तूंच्या किमती कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे महागाईवरील दबाव कमी करण्याचा प्रयत्न म्हणूनही या निर्णयाकडे पाहिले जात आहे.
याशिवाय रेअर अर्थ मिनरल्स हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. संरक्षण उपकरणे, स्मार्टफोन, इलेक्ट्रिक वाहने आणि ग्रीन एनर्जी क्षेत्रासाठी ही खनिजे अत्यंत महत्त्वाची आहेत. या क्षेत्रातील चीनचे वर्चस्व असल्याने अमेरिकेला चीनसोबतचे आर्थिक संबंध पूर्णपणे तोडणे कठीण आहे.
भारताची चिंता का वाढू शकते? US-China Trade War:
गेल्या काही वर्षांत अनेक जागतिक कंपन्यांनी ‘चायना प्लस वन’ रणनीती स्वीकारत चीनबाहेर उत्पादनासाठी भारतासह इतर देशांचा पर्याय निवडण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका-चीन व्यापार संबंध सुधारल्यास काही कंपन्या पुन्हा चीनमधून खरेदी करण्याकडे वळू शकतात. त्याचा परिणाम भारताच्या उत्पादन क्षेत्रावर आणि निर्यातीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मात्र, या परिस्थितीत भारतासाठी काही संधीही कायम आहेत. चीनने अमेरिकन सोयाबीन आणि काही कृषी उत्पादनांवरील शुल्क पूर्णपणे कमी केलेले नसल्याने भारतीय कृषी निर्यातदारांसाठी चीनच्या बाजारपेठेत संधी निर्माण होऊ शकते.
त्याचबरोबर हाय-टेक मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि पुरवठा साखळीतील विविधता यासाठी भारताचे महत्त्व कायम राहू शकते. त्यामुळे अमेरिका-चीनमधील हा करार भारतासाठी एकाच वेळी आव्हान आणि संधी दोन्ही घेऊन आला आहे.






