अमेरिका-चीन व्यापार युद्ध तीव्र: अमेरिकेचे 145, चीनचे 125 टक्के आयात शुल्क

बीजिंग – अमेरिकेने चिनी वस्तूच्या आयातीवर तब्बल 145 टक्के आयात शुल्क लावले आहे. यानंतर चीननेही अमेरिकेच्या वस्तूवर 125 टक्के आयात शुल्क लावले आहेत. आता अमेरिकेने आणखी आयात शुल्क वाढवणे म्हणजे हास्यास्पद ठरेल, असे चीनच्या सीमाशुल्क विभागाने सांगितले. कारण आणखी आयात शुल्क लावले तर ते व्यावहारिक दृष्टया हास्यास्पद ठरेल आणि जागतिक आर्थिक इतिहासात तो एक विनोद समजला जाईल असे चीनकडून सांगण्यात आले.
सध्या असलेले आयात शुल्काचे दर चीनसाठी निर्यातीकरिता निरुपयोगी ठरणार आहेत. कारण याची अंमलबजावणी करता येणे शक्य नाही. त्यामुळे आता अमेरिकेने जरी आयात शुल्क वाढविले तरी चीन त्याकडे दुर्लक्ष करणार असल्याचे चीनने म्हटले आहे.
अमेरिकेने अशा प्रकारचे हास्यास्पद कृती जागतिक व्यापारात करू नये असे सांगून चीनने अमेरिकेच्या या कृतीविरोधात जागतिक व्यापार संघटनेकडे तक्रार केली आहे. असे असले तरी जेव्हा केव्हा अमेरिकेला आपली चूक लक्षात येईल तेव्हा अमेरिकेने जर चर्चेतून या विषयावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला तर चीन सकारात्मक प्रतिसाद देईल. मात्र अमेरिकेने दबाव तंत्राचा वापर जागतिक व्यापारात करणे सोडून द्यावे. व्यापार युद्धात कोणाचाही फायदा होणार नाही. मात्र जर कोणी सुरू करणारच असेल तर आम्ही युद्ध चालू ठेवण्यास तयार आहोत असे चीनने स्पष्ट केले.
दादागिरी रोखण्याची गरज- शी जिनपिंग
दरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेची दादागिरी रोखण्यासाठी चीन आणि युरोपियन समुदायाने समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. चीन भेटीवर असलेल्या स्पेनचे पंतप्रधान पेड्रो साएंझ चेंज यांच्याशी चर्चा करताना जिनपिंग म्हणाले की, अमेरिकेने दादागिरी केल्यास अमेरिका एकटी पडेल. त्याचबरोबर जगाचे हे नुकसान होईल. जागतिक व्यापारामुळेआर्थिक जागतिकीकरण होत आहे. यामुळे सर्व जगाचा फायदा होत आहे. मात्र अमेरिकेने दादागिरी करून ही व्यवस्था विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले





