काराकस, (व्हेनेझुएला) : अमेरिकेने आज पहाटेच्या सुमारास व्हेनेझुएलामध्ये बॉम्ब हल्ले करून व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले. मादुरो दाम्पत्याला अमेरिकेत हलवले गेले असल्याचे शक्यता वर्तवण्यात येते आहे. राजधानी काराकसमध्ये पहाटेच्या सुमारास मोठे बॉम्बस्फोट झाले. यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरून पळापळ झाली. या बॉम्ब हल्ल्यात किती जण ठार झाले याची नेमकी आकडेवारी उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र अल्पावधीतच अध्यक्ष मादुरो यांनी सुरक्षा दलांना आपत्कालिन कारवाईसाठी सतर्क राहण्याचे आदेश दिले आणि देशभर आणीबाणी लागू झाल्याचे जाहीर केले होते. मात्र त्यानंतर मादुरो यांना ताब्यात घेऊन देशाबाहेर नेण्यात आल्याचेही ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अमेरिकेत ड्रग्जची तस्करी केल्याच्या आरोपाखाली मादुरो यांच्यावर अमेरिकेत कायदेशीर कारवाई केली जाण्याचे संकेत ट्रम्प प्रशासनाने दिले आहेत. ट्रम्प प्रशासनाने आज केलेल्या लष्करी कारवाईवरून व्हेनेझुएलाने अमेरिकेच्या ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका केली आहे आणि त्यांच्यावर अत्यंत गंभीर लष्करी आक्रमकता केल्याचा आरोप केला आहे. उपराष्ट्रपती उपाध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस जिवंत असल्याचा पुरावा आणि त्यांचा ठावठिकाणा अमेरिकेने जाहीर करण्याची मागणी केली आहे. तर व्हेनेझुएलाचे संरक्षण मंत्री व्लादिमीर पॅड्रिनो लोपेझ यांनी देशभरात लष्करी दल तैनात करण्याची घोषणा केली आहे. रशिया, इराक आणि इराणसह जगातील अनेक देशांनी व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या लष्करी हल्ला म्हणजे देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे उघड उल्लंघन असल्याची टीका केली आहे. क्युबाचे अध्यक्ष मिगुएल डियाझ-कॅनेल यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकने तातडीने प्रतिसाद देण्याची मागणी केली. गेल्या काही महिन्यांपासून व्हेनेझुएलाविरोधात ट्रम्प प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली होती. ड्रग्ज तस्करीला मादुरो यांचा पाठिंबा असल्याचा आरोप ट्रम्प करत होते.भूमध्य समुद्रात व्हेनेझुएलाच्या काही बोटींवर अमेरिकेच्या हवाई दलाने वारंवार हल्ले केले होते. तसेच तेथील तेल वाहतूक रोखण्यासाठी टँकर रोखला होता. व्हेनेझुएलामधून होणारी ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी लष्करी बळाचा वापर केला जाईल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला होता.