चीनने अमेरिकेला दिला मोठा हादरा; DeepSeek AIमुळे अमेरिकेच्या कंपन्यांचे शेअर कोसळले

नवी दिल्ली – कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. अमेरिकेतील कंपन्या या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून काम करीत आहेत. गेल्या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत अमेरिकेतील काही तंत्रज्ञान कंपन्यांनी तब्बल 500 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात काम करायचे ठरविले आहे.
मात्र दरम्यानच्या काळामध्ये चीनचे डीपसिक नावाचे कृत्रिम बुद्धिमत्ता अॅप जागतिक पातळीवर उपलब्ध करण्यात आले. या अॅपला अमेरिकेबरोबरच जगातील विविध देशातील ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या क्षेत्रात अमेरिका जगाचे नेतृत्व करू शकेल की नाही याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत.
या घडामोडीनंतर अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात काम करणार्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वेगाने घट होत आहे. एवढेच नाही तर अमेरिकेतील नॅशडॅक या शेअर बाजाराचे निर्देशांक वेगाने कमी होत आहेत. नशडॅॅकवर अमेरिकेतील बहुतांश माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची नोंदणी झालेली असते.
एनव्हिडिया ही अमेरिकेतील कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी समजली जाते. आज या कंपनीच्या शेअरच्या भावात एकाच दिवसात 5% घट झाली. अमेरिकेतील कंपन्यांनी चॅट जीपीटी आणि इतर अॅप उपलब्ध केली आहेत. मात्र चिनी अॅपची लोकप्रियता या सर्व अपेक्षा वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर चीन कृत्रीम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कामासाठी कमी किमतीच्या सेमीकंडक्टर चीप उपलब्ध करण्याची शक्यता वाढली आहे.
अशा परिस्थितीत अमेरिकेच्या सेमी कंडक्टर चीपची मागणी कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे गेल्या पंधरवड्यात अमेरिकेने सेमी कंडक्टर तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र अमेरिकेचे तंत्रज्ञान जगाला फारसे उपयोग नाही असे यातून दिसून येते असे काही विश्लेषकांनी सांगितले.





