तात्काळ पाकिस्तानातून बाहेर पडा, सुरक्षित स्थळी आश्रय घ्या; अमेरिकेच्या नागरिकांना सूचना

लाहौर : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानातील लाहौर आणि रावलपिंडीसह प्रमुख शहरांमध्ये स्फोट झाले आहे. भारताने 7 मे रोजी मध्यरात्री दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांदरम्यान सीमेवर तीव्र गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानने 8 मे रोजी भारतातील 15 शहरांवर मिसाइल हल्ल्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या S-400 हवाई संरक्षण यंत्रणेने तो हवेतच निष्फळ केला. प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तानची HQ-9 हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त केली, ज्यामुळे लाहौर आणि रावलपिंडीत स्फोट झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
अमेरिकेची आपत्कालीन सल्लागार सूचना –
लाहौरमधील अस्थिर परिस्थितीमुळे अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी तातडीची सल्लागार सूचना जारी केली आहे. अमेरिकन दूतावासाने लाहौर आणि पंजाब प्रांतातील सर्व नागरिकांना तात्काळ शहर सोडण्याचे किंवा सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचे निर्देश दिले आहेत. “लाहौर आणि परिसरात ड्रोन स्फोट, पाडलेली ड्रोन्स आणि संभाव्य हवाई हल्ल्यांमुळे सर्व अमेरिकन वाणिज्य दूतावास कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्यास सांगितले आहे. सक्रिय संघर्ष क्षेत्रात असलेल्या नागरिकांनी सुरक्षितपणे बाहेर पडावे किंवा आश्रय घ्यावा,” असे अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे.
पाकिस्तानचा हल्ला निष्फळ, भारताचे चोख प्रत्युत्तर –
7-8 मे च्या रात्री पाकिस्तानने अवंतिपोरा, श्रीनगर, जम्मू, पठानकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपुर, बठिंडा, चंडीगढ, नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या 15 भारतीय शहरांवर ड्रोन आणि मिसाइल हल्ल्यांचा प्रयत्न केला. भारताच्या S-400 ‘सुदर्शन चक्र’ हवाई संरक्षण यंत्रणेने आणि एकात्मिक काउंटर UAS ग्रिडने हे हल्ले यशस्वीपणे नाकाम केले. प्रत्युत्तरात भारताने लाहौर येथील पाकिस्तानची HQ-9 हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केली, ज्यामुळे पाकिस्तानी लष्कराला मोठा धक्का बसला.
सीमेवर तणाव, नागरिकांमध्ये भीती –
पाकिस्तानच्या गोळीबारामुळे जम्मू-काश्मीरमधील पूंछ, तंगधार आणि राजौरी भागात 16 नागरिकांचा मृत्यू झाला, तर 43 जण जखमी झाले. भारतानेही प्रत्युत्तरात जोरदार गोळीबार केला. लाहौरमधील वॉल्टन रोड आणि वॉल्टन विमानतळाजवळ स्फोट झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तानने लाहौर, कराची आणि सियालकोट विमानतळांवर उड्डाणे तात्पुरती बंद केली आहेत.
भारताने आपली कारवाई संयमित आणि गैर-विस्तारी असल्याचे सांगितले असून, पाकिस्तानकडून आणखी उकसवणूक झाल्यास कठोर प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवली आहे.





