मुंबई – अमेरिकेने भारताविरुद्ध लागू केलेल्या 50% आयात शुल्काचा भारतीय निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत भारताची चालू खात्यावरील तूट वाढू शकते. याच कारणामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री वाढली आहे. भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक गेल्या तीन दिवसापासून कोसळत आहेत. याचा दबाव भारतीय रुपयावर येत असून शुक्रवारी रुपयाचा भाव 61 पैशांनी कोसळून 88.19 रुपये प्रति डॉलर या निचांकी पातळीवर गेला. प्रथमच रुपयाचा भाव 88 रुपयापेक्षा जास्त झाला आहे. चलन बाजारातील व्यापार्यांनी सांगितले की, महिन्याच्या शेवटी आपले व्यवहार पूर्ण करण्यासाठी आयातदार डॉलरची मागणी वाढवीत असतात. अशा परिस्थितीत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुपयाच्या मूल्यावर दबाव येत असतो. पुढील आठवड्यात परिस्थिती सुरळीत होण्याची शक्यता असल्याचे या व्यापार्यांचे म्हणणे होते. गेल्या आठवड्यातही रुपयांच्या मूल्यावर दबाव होता. मात्र तरीही रुपयाचे मूल्य कोसळले नव्हते. कारण रिझर्व बँकेने या क्षेत्रात बराच हस्तक्षेप केला असल्याचे बोलले जाते. भारतीय निर्यात वाढविण्यासाठी आता निर्यातदारांना कमी वेळ आहे. त्यामुळे मध्यम ते लघु पल्ल्यात तरी भारताच्या परकीय गंगाजळीवर याचा परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत रुपयांच्या मूल्यावर दबाव येऊ शकतो असे समजले जात आहे. आतापर्यंत भारतातील महागाई नियंत्रणात होती आणि नियंत्रण राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता रूपया कोसळल्यानंतर भारताला आयात त्या प्रमाणात मागात पडणार आहे. त्यामुळे भारताच्या महागाईच्या आकडेवारीवरही नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात जर जागतिक खनिज तेलाच्या किमती वाढल्या तर भारताला परकीय चलन जास्त प्रमाणात खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे या आघाडीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जाते. व्यापार युद्ध आणि रशिया- युक्रेन युद्धामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार डॉलर केंद्री वित्तीय उत्पादनात खरेदी करीत आहेत. अशा परिस्थितीत या गुंतवणूकदारांनी भारतातून विक्री वाढविली आहे. काल या गुंतवणूकदारांनी 3,856 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.