प्रभात वृत्तसेवा उरुळी कांचन – जुन्या वादातून झालेल्या खूनप्रकरणातील दोन फरार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखा व उरुळी कांचन पोलिसांनी सोलापूरातून ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली.स्वप्निल शिवाजी चौधरी व आदेश रेवलनाथ चौधरी (रा. नायगाव, पेठ, ता. हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, संपत तुकाराम चौधरी (वय ४८, रा. वडाचीवाडी, पेठ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी यश संपत चौधरी यांच्या तक्रारीवरून १९ डिसेंबर रोजी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १९) पेठ गावच्या हद्दीत, थेऊर-पेठ रोडलगत म्हसोबा मंदिराजवळील शेतात संपत चौधरी यांचा अज्ञात व्यक्तींनी हत्याराने मारहाण करून खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासासाठी उरुळी कांचन पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तयार करण्यात आली होती. तांत्रिक तपास व मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी सोलापूर येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सोमवारी (दि. २९) त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपी व मृत यांच्यात यापूर्वी वाद असून, त्याच वादातून संगनमताने खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी देण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे करीत आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकरउरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस उप-निरीक्षक प्रविण कांबळे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमित सिद-पाटील, हवालदार योगेश नागरगोजे, सुमित वाघ यांचे पथकाने केली आहे.