प्रभात वृत्तसेवा उरुळी कांचन – पेठ (ता. हवेली) येथील एका 60 ते 62 वयोगटातील व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 19) उघडकीस आली. ही घटना पेठ-वडाचीवाडी ग्रामपंचायत हद्दीतील म्हसोबा मंदिर परिसरात घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.संपत चौधरी (वय अंदाजे 60 ते 62, रा. पानमळा, वडाचीवाडी, पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चौधरी यांचा मृतदेह घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. मात्र हा खून कोणत्या कारणातून व कोणी केला, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. सदर खून पूर्ववैमनस्यातून झाला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे, सहायक फौजदार रमेश भोसले, पोलीस हवालदार प्रवीण चौधर, निलेश जाधव, उद्धव गायकवाड, सुनील सस्ते, रवी फड, अजित काळे, गाडेकर आदी अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात येत असून तपासाला वेग देण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची बातमी वार्यासारखी परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. या खुनामागील नेमके कारण आणि आरोपी कोण, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.