ब्रुसेल्स : युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वोन डेर लेयन यांच्याविरोधात मांडला गेलेला अविश्वास ठराव आज फेटाळला गेला. युरोपीय संघाच्या संसदेतील बहुसंख्य सदस्यांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केल्यामुळे लेयन यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ठरावाच्या निमित्ताने उर्सुला वोन डेर लेयन यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. त्यात कोविड-१९ चया साथीच्या काळात फायझर औषध कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना खासगी मेसेज पाठवणे, युरोपीय संघाच्या निधीचा गैरवापर करणे आणि जर्मनी आणि रोमानियातल्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचे आरोप होते. मात्र फ्रान्समधील स्ट्रासबर्ग येथे झालेल्या युरोपीय संसदेच्या पुर्ण सत्रादरम्यान झालेल्या मतदानामध्ये ३६० सदस्यांनी उर्सुला वोन डेर लेयन यांच्या बाजूने आणि ठरावाच्या विरोधात मतदान केले. तर अविश्वास ठरावाच्या बाजूने केवळ १७५ सदस्यांनी मतदान केले. संसदेतील१८ सदस्य मात्र ठरावावर तटस्थ राहिले. वोन डेर लेयन या मतदानाच्यावेळी अनुपस्थित होत्या. वोन डेर लेयन यांच्यावर कोरोनाच्या साथीपासून औषध उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीवरून टीका करण्यात येते आहे. युरोपातील ४५० दशलक्ष नागरिंना कोरोनाची लस उपलब्ध करून देण्यासाठी युरोपीय संघाने पुढाकार घेतल्याबद्दल त्यांना आणि युरोपीय संसदेतील सर्वात मोठा राजकीय गट असलेल्या युरोपीयन पीपल्स पार्टीला उत्तरदायी ठरवले जात होते.