मुंबई: पूरग्रस्त भागातील स्वच्छतेच्या कामासाठी मुंबई, पुण्यातून स्वयंसेवक येत आहेत. यात कॉंग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीही पुढाकार घेतला आहे. बुधवारी त्या मदत पथकासह सांगली, कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी इतरांनाही पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केले आहे. मदतीसाठी आवाहन करणारा त्यांचा एक व्हिडिओही व्हॉट्सअपवर शेअर होत आहे.
उर्मिला मातोंडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करताना, यंदाचा स्वातंत्र्यदिन हा कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना समर्पित करण्याचे आवाहन केले आहे. केवळ मदतीसाठी किंवा सुटकेसाठी प्रार्थना करण्यापेक्षा पूरग्रस्तांना मदतीचा थेट हात द्या, असे उर्मिला यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्यासोबत कर्तव्य येते आणि हे कर्तव्य पार पाडण्याची वेळ आज आपल्यावर आली आहे. यंदाचा स्वातंत्र्यदिन आपण कोल्हापूर, सांगलीच्या पूरग्रस्तांसाठी समर्पित करून आपले कर्तव्य पार पाडू, असे उर्मिला यांनी म्हटले आहे. उर्मिला यांच्या मदतीच्या ताफ्यात पूरग्रस्तांसाठीचे जीवनावश्यक साहित्य असून, वैद्यकीय मदतीसाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. उर्मिला मातोंडकर या कॉंग्रेसच्या नेत्या असून, त्यांनी मे महिन्यात मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. निवडणुकीत भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.